प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आता फेसबुक, इन्स्टाग्रामदेखील


नवी दिल्ली – आपले अनेक प्रकारचे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची प्रत्येकालाच हौस असते. पण आता तुमची ही हौस तुम्हाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. आता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर तुमच्या या फोटोंवर मित्रमंडळींसोबतच असणार आहे.

बँक आणि पॅन कार्ड आधारशी मोदी सरकारच्या कार्यकाळात जोडल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आता सोशल मीडियावरही नजर ठेवणार आहे. प्राप्तिकर विभागाची आता बँकेतील व्यवहारांसोबतच आता सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या छायाचित्रांवर करडी नजर असेल. सात वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करुन ‘प्रॉजेक्ट इन्साइट’ प्राप्तिकर विभागाने राबवला आहे. जगातील सर्वात मोठा बायोमेट्रीक डाटाबेस तयार करण्यात आला असून प्रणालीच्या विकासासाठी एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडची मदत घेण्यात आली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या एका टीमकडून दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवर नजर ठेवली जाईल. वार्षिक उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसला नाही तर त्यांची चौकशी होईल. पण सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन याद्वारे होणार नाही. चौकशीचा ससेमिरा प्रत्येकाच्या मागे लागणार नाही असे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर करडी नजर ठेवल्यास घरात छापा न टाकताच आम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment