आता फोनवर बोलणेही महागणार!


नवी दिल्ली : इंटरकनेक्शन यूझर्स चार्ज (आययूसी) वाढवण्याची मागणी एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनने केल्यामुळे आता फोनवर बोलणेही महागण्याची शक्यता आहे. ३० ते ३५ पैसे इंतर कंपन्यांचे कॉल जोडण्यासाठी प्रती मिनिट खर्च येतो, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

आययूसीमध्ये कोणताही बदल केल्यास त्याचा थेट परिणाम कॉल दरांवर होऊ शकतो. कारण कॉल दर ठरवताना या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष दिले जाते. तर दुसरीकडे इनकमिंग कॉल्सवर कोणताही चार्ज लागू नये, असे रिलायन्स जिओचे मत आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’सोबत कंपन्यांची बैठक झाली. काही कंपन्यांनी या बैठकीमध्ये आययूसीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. तर काहींनी आहेत, तेच दर ठरवण्याचे मत व्यक्त केल्याची माहिती बैठकीनंतर ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली.

ट्रायकडून आययूसी निश्चित केला जातो. सध्या १४ पैसे आययूसी प्रत्येक इनकमिंग कॉलवर आकारला जातो. तो १४ पैशांवरुन ३० ते ३५ पैसे प्रति मिनिटांनी वाढवण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे. कोणत्याही कंपनीचे नाव शर्मा यांनी घेतले नाही. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलने आययूसी ३० ते ३५ पैशांनी वाढवण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment