शाळेच्या दारात तंबाखूची विक्री


महाराष्ट्रामध्ये तंबाखूचे व्यसन हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कित्येक कुटुंबांमध्ये कुटुंबाचे प्रमुख किंवा कुटुंबातील मुलांचे पालक मुलांदेखत तंबाखू खातात. ही गोष्ट एवढी सामान्य झालेली आहे पण यात काही चूक आहे असे कोणालाच वाटत नाही. जिथे पालक मुलांसमोर तंबाखू खातात त्याच कुटुंबातली मुले शिक्षण घेत घेत आठवी-नववीत गेली की तीसुध्दा हळूहळू तंबाखूचे बार भरायला लागतात. यथावकाश ते आपल्या पालकांसमोरच तंबाखू खायला लागतात. मात्र ग्रामीण भागातला कोणताही पालक आपल्या मुलाला तंबाखू खाल्ल्याबद्दल रागावत नाही. ते व्यसन आहे, ते वाईट आहे असा कोणी विचारच करत नाही. आयुष्यात छान जगायचे असेल तर कसली तरी तल्लफ पाहिजेच. तेव्हा मुलाने तंबाखू खाण्याची तल्लफ केली तर त्यात काही वाईट घडले असे कोणी मानतच नाही.

शहरामध्ये थोडे निर्बंध आहेत. आता सिगारेट सार्वजनिक ठिकाणी ओढणे हा प्रकार कमी होत चालला आहे. कोणत्याही प्रकारे तंबाखूचा वापर करण्याची सवय मुलांना जडता कामा नये याबाबत शिक्षण खाते आणि सरकार प्रयत्नशील आहेत. म्हणूनच शहरात तरी निदान मुलांना सहज तंबाखू उपलब्ध होऊ नये असे काही नियम केले गेलेले आहेत. त्यानुसार शाळांच्या आणि महाविद्यालयांच्या दारात तंबाखू, गुटखा, जर्दा आदी उपलब्ध होता कामा नयेत. असा नियम करण्यात आलेला आहे. कोणतेही व्यसन सहजतेने उपलब्ध व्हायला लागले की त्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे हा नियम मुलांच्या हिताचाच आहे. मात्र आपण हळूहळू असे नियम मोडायला लागतो आणि मग त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही.

आता एका मराठी वृत्तपत्राने या दृष्टीने शाळा, महाविद्यालयांची विशेष पाहणी केली असता काही नामवंत शाळांच्या दारातच पानांच्या टपर्‍या टाकलेल्या दिसल्या. या टपर्‍यांवर विडी, सिगारेट, तंबाखू आणि गुटखा हे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात असे दिसले. सरकार एका बाजूला व्यसनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसर्‍या बाजूला सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणारे अधिकारी नियमभंगाकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असतानाच या व्यसनांची दिक्षा मिळायला लागली आहे आणि पुढची पिढी व्यसनाधीन होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

Leave a Comment