
मुंबई: जीएसटी देशात १ जुलैपासून लागू होणार असून आतापर्यंतच्या कर व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असणार आहे. यापुढे देशभरात वस्तू आणि सेवांवर फक्त एकच टॅक्स असणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब ठेवले आहेत.
मोबाईल बिल आणि रिचार्ज व्हाऊचरमध्ये जीएसटीनतंर होणार मोठे बदल!
टेलिकॉम इंडस्ट्रीचा जर विचार केला तर टेलिकॉम सेक्टर जीएसटीमुळे महाग होणार आहे. कारण की, टेलिकॉम सेक्टरसाठी केंद्र सरकारने १८ टक्के टॅक्स स्लॅब निश्चित केला आहे. सध्या टेलिकॉमवर १५ टक्के टॅक्स लागतो. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात सध्या नाराजी आहे.
सरकारने टेलिकॉम क्षेत्र पहिल्यापासूनच अडचणीत असताना अशावेळी यावर १८ टक्के स्लॅब ठेवल्याने या क्षेत्रातील अडचणीत भर पडली आहे. पण कंपन्या आपल्यावरील या टॅक्सचा हा भार यूजर्सवरच टाकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने एंट्री केल्यापासून सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी अनलिमिटेड कॉलिंग सुरु केले आहे. तसेच डेटाच्या किंमतीतही कपात केली आहे. अशावेळी या क्षेत्रासाठी टॅक्सचे दर वाढल्याने अडचणीचे ठरु शकते. पोस्टपेड यूजर्सचा विचार केल्यास त्यांना जीएसटी महाग पडणार आहे. जर एखाद्या यूजरचे बिल आतापर्यंत १००० रुपये येत असेल तर जीएसटी लागू झाल्यानंतर यामध्ये ३० रुपये आणखी वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला १०३० रुपये बिल भरावे लागणार आहे. तर कंपन्या प्रीप्रेड यूजर्सला कमी टॉकटाईम देऊ शकतात. एका वृत्तानुसार, १ जुलैपासून सर्व टॉकटाइम ऑफर देणाऱ्या वाउचरवर कंपन्या १८ टक्के जीएसटी लागू करणार आहे. त्यामुळे फुल टॉकटाइम मिळणाऱ्या प्लानवर कमी टॉकटाइम मिळू शकते.
व्होडाफोन, एअरटेल, आयडिया यासारख्या कंपन्या अनलिमिटेड कॉलिंगशिवाय फ्री अॅडिशनल डेटाही देत आहेत. सध्या एअरटेल आणि व्होडाफान आपल्या ग्राहकांसाठी फ्री डेटा देत असल्यामुळे १ जुलैपासून टेलिकॉम क्षेत्रात नेमके काय उलथापालथ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
