गणिताच्या आयचा घो


पाच सात वर्षांपूर्वी मराठीत, शिक्षणाच्या आयचा घो, हा चित्रपट आला होता. आपल्या मुलाने क्रिकेट न खेळता केवळ पुस्तकातला कीडाच व्हावे असा अट्टाहास करणार्‍या पालकाचा हा चित्रपट अनेकांचे डोळे उघडणारा ठरला होता. आपल्या शिक्षणात अनेक विषयांची खिचडी करण्यात आली आहे आणि तिच्यातल्या काही विषयांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही हे दिसत असूनही ते निरर्थक विषय तिथेच ठाण मांडून बसले आहेत. ते विषय केवळ निरर्थकच आहेत असे नाही तर अनेक मुलांमध्ये त्या विषयांचे कौशल्य प्राप्त करण्याची उपजत जाण नसल्याने ती मुले या विषयात नापास होतात. अशा विषयांत प्रामुख्याने इंग्रजी आणि गणिताचा समावेश आहे.

हजारो मुले अन्य विषयांत पारंगत असतात पण केवळ या दोन विषयात त्यांना गती नसते म्हणून नापास होतात. कितीही प्रयत्न करून हे दोन विषय त्यांचा छळवाद सोडत नाहीत. अन्य विषयांत गोडी असूनही केवळ या दोन कट्टर शत्रूंमुळे त्यांना दहावीला कायम नापास असा शिक्का आपल्या कपाळावर मारून घ्यावा लागतो. हे दोन विषय वगळले तर त्यांचे काही बिघडत नाही. पूर्वी ते वगळण्याची सवलत होती. तेव्हा अनेक मुले या दोन विषयांना वळसा घालून पदवीधरही होत असत. पण आता या दोन विषयाची सक्ती असल्यामुुळे पदवीधर होण्याची क्षमता असूनही दहावी नापास ही पदवी मिळवून जन्मभर न्यूनगंडात जगत राहतात. म्हणून एका जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला गणित ऑप्शनला टाकण्याची सवलत देण्याबाबत विचारणा केली आहे.

न्यायालयाच्या या प्रश्‍नाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला तर अनेक विद्यार्थ्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुसह्य होईल आणि त्यांची पदवी मिळवण्यातली अडचण दूर होईल. आपल्या देशात शिक्षणात गळती फार आहे. तिला अनेक कारणे आहेत. मात्र गणित आणि इंग्रजीची सक्ती असल्यामुळे शिक्षणातला रस संपणे हे सर्वात मोठे कारण आहे. आयुष्य जगायला आवश्यक तेवढे गणित आले तरी चालते. तेवढे शिकवून मुलांना गणितापासून मुक्त केले पाहिजे. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज किती आणि चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढावे या गोष्टींचा जाच त्यांना होता कामा नये. शिक्षण हे कठीण असले पाहिजे ही शिक्षणाची संकल्पना आता मागे पडली आहे. आता जे शिक्षण घेताना मुलांना आनंद वाटतो ते शिक्षण खरे ही संकल्पना रूढ होत आहे.

Leave a Comment