नवी दिल्ली – पाचशे रुपयांची नवी नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात आणणार असून पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
सध्याच्या नोटासोबत चलनात येणार पाचशे रुपयांच्या नव्या नोटा
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे चलनातून बाद झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर जारी केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून आता चलनात आणल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची रचना सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील असणार आहेत.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांनी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर इतर कोणत्याही मूल्यांच्या नोटा बाजारात आणण्याचा मानस नसल्याचे म्हटले आहे. लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीदेखील विश्वनाथन यांनी सांगितले. केंद्र सरकारचा पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेला दिली आहे.