पाच वर्षांच्या चिमुकल्याला मर्सिडिजचे सरप्राईज गिफ्ट


एखादी गाडी प्रत्येकाला लहानपणापासून आपली ‘ड्रिम कार’ आहे असे वाटते. लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये गाड्यांचे आकर्षण असल्यानेच सर्वाधिक गाड्यांचे प्रमाण असते. आपण मोठे झाल्यावर अशीच गाडी घेणार, असे म्हणत अनेक मुले लहानाची मोठी होतात. असेच एक पाच वर्षांच्या एका चिमुकल्याने देखील स्वप्न पाहिले. या मुलाचे नाव हितार्थ असे असून त्याला मर्सिडिज बेंझबद्दल प्रचंड आकर्षण आहे. मर्सिडिजला ट्विटरच्या माध्यमातून हितार्थच्या याच मर्सिडिज प्रेमाची माहिती त्याचे वडिल निपुण ढोलकिया यांनी दिली. छोट्या हितार्थला यानंतर मर्सिडिजने एक छान सरप्राईज दिले आहे.

निपुण ढोलकिया यांच्या ट्विटला मर्सिडिजने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. आमच्या छोट्या चाहत्यासोबत आम्हाला आमच्या गाडीतून फेरफटका मारायला आवडेल, असे उत्तर मर्सिडिजकडून निपुण ढोलकिया यांना देण्यात आले. ढोलकिया यांच्यासाठी मर्सिडिजकडून मिळालेले हे उत्तर आश्चर्याचा सुखद धक्का होता. ऐवढी मोठी दिग्गज कंपनी आपल्या ट्विटची दखल घेऊन आपल्या चिमुरड्याला गाडीतून फेरफटका मारुन आणण्यासाठी निमंत्रण देईल, याची कल्पनादेखील निपुण यांनी केली नव्हती.

मर्सिडिजच्या उत्तरानंतर निपुण ढोलकिया यांनी आनंद व्यक्त केला आणि हितार्थ पुढील काही वर्षांमध्ये मर्सिडिजचा ग्राहक होईल, अशी आशादेखील व्यक्त केली. निपुण यांच्या ट्विटला उत्तर दिल्यानंतर मर्सिडिजकडून त्यांच्या कुटुंबाची माहिती मागवण्यात आली. यानंतर चिमुरड्या सार्थकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मर्सिडिज बेंझच्या अहमदाबादमधील डिलरला सूचनादेखील करण्यात आल्या.

छोट्या हितार्थपासून हा संपूर्ण घटनाक्रम लपवून ठेवण्यात आला. थेट मर्सिडिज कारमधून फेरफटका मारण्यासाठी हितार्थला घेऊन जात कंपनीने त्याला सुंदर सरप्राईज दिले. कारबद्दल आम्हाला नेमकी माहिती नाही. मात्र ती एसयूव्ही होती. बहुधा ती जीएलसी असावी, असे निपुण ढोलकिया यांनी सांगितले. शहराचा मर्सिडिज कारमधून फेरफटका मारल्यावर हितार्थला मर्सिडिजच्या शोरुममध्ये नेण्यात आले. मर्सिडिजच्या विविध कार शोरुममध्ये हितार्थला दाखवण्यात आल्या. हितार्थला यासोबतच एएमजी पझल आणि एक छोटी मर्सिडिज गाडी भेट म्हणून देण्यात आली.

Leave a Comment