इस्रोची ‘मुहूर्तमेढ’ चुकली!


नवी दिल्ली – भारताच्या व्यावसायिक बाजारपेठेच्यादृष्टीने संपूर्ण दिशादर्शक प्रणाली उभारण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) भारतातील विविध ठिकाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या सातपैकी एका उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

स्वयंचलित घड्याळांचा वापर भारताकडून नुकत्याच प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘आयएनआरएसएस-१ ए’ या उपग्रहात अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी करण्यात आला आहे. भारतातील ठिकाणांची अचूक माहिती पुरवण्यात युरोपमधून खास मागवण्यात आलेल्या या घड्याळांमुळे मदत होणार होती. या घड्याळांशिवाय ठिकाणांबद्दलची अचूक माहिती मिळवणे शक्य नाही.

यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, ‘आयएनआरएसएस-१ ए’ उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडली आहेत. ही घड्याळे वगळता उपग्रहातील इतर घटक व्यवस्थितपणे काम करत आहेत. ‘आयएनआरएसएस-१ ए’ हा उपग्रह संदेशवहनासाठी वापरला जाणार होता. त्यामुळे या उपग्रहातील घड्याळे बंद पडल्याने संपूर्ण दिशादर्शक प्रणालीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे आता आम्ही येत्या जुलै महिन्यात नवीन उपग्रह अवकाशात पाठवणार असल्याचे किरणकुमार यांनी सांगितले.

Leave a Comment