शासनासोबत काम करण्याची युवकांना सुवर्णसंधी


मुंबई – ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ या कार्यक्रमाची रचना प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी करण्यात आलेली असून गेल्या २ वर्षांपासून शासनाच्या नियोजन विभागामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ राबविली जात आहे. या कार्यक्रमाचा उद्देश युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा हा असून सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमामुळे मिळतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना विकासाच्या वाटचालीत मला साथ द्या. सोबत मिळून काम करू आणि नव्या महाराष्ट्राचे निर्माण करू, असे आवाहन केले आहे. उत्साही, जबाबदार व उद्यमशील युवकांचे या कार्यक्रमासाठी स्वागत आहे. तुमची कल्पकता, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची कास शासनात रुजविण्यासाठी मी उत्सूक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी २१ ते २६ वर्षे वय असलेल्या कोणत्याही शाखेची प्रथम वर्ग पदवी, एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठीचे ज्ञान या निकषात बसणारा कोणीही युवक/युवती अर्ज करू शकेल. ११ महिन्यांच्या या कार्यक्रमादरम्यान दरमहा विद्यावेतनही दिले जाते. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१७ ची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी http://mahades.maharashtra.gov.in/files/noticeboard/cmfp_2017.pdf या लिंकवर क्लिक करा.

या कार्यक्रमाची आखणी सामाजिक विकास क्षेत्रात रस असणाऱ्या तरुणांमधील नेतृत्त्व गुण जोपासणे, त्यांचे प्रशासनासंदर्भातील ज्ञान वृद्धिंगत करणे, भविष्यातील नेतृत्त्वाच्या मोठ्या संधींसाठी युवकांना तयार करणे यासाठी केलेली आहे. युवकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून धोरण निर्मिती, अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अशा विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये शासनासोबत काम करण्याची दुर्मिळ संधी मिळते. त्या सोबतच राज्यातील विविध नामांकीत संस्थांना भेटी तसेच उद्योग, कला, लेखन, पत्रकारिता, मनोरंजन आदी क्षेत्रातील नामवंतांच्या भेटीच्या संधीही या कार्यक्रमामुळे फेलोजनांना मिळतात.

या युवकांच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा एक मैलाचा दगड ठरतो आहे. या कार्यक्रमामुळे धोरण, प्रशासन, राज्यशास्त्र, व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षण वा व्यावसायिक संधी सहज साध्य होऊ शकतात. १५ जून २०१७ फेलोशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून अधिक तपशीलासाठी http://mahades.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Comment