अंध प्रांजलचे यूपीएससीच्या परीक्षेत खणखणीत यश


मुंबई : प्रांजल पाटील या उल्हासनगरच्या मुलीने यूपीएससीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवले असून मागच्या वर्षी याच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे अकाऊंट सर्व्हिसची पोस्ट तिला नेत्रहीन असल्याने पूर्णपणे नाकारली गेली होती.

तिला रेल्वे ही सर्व्हिस द्यायला तयार नसल्याने शेवटी इंडियन पोस्टल अँड कम्युनिकेशन ही दुसरी पोस्ट तिला देण्यात आली होती. प्रांजलची जिद्द एवढी मोठी की, तिने यंदा थेट १२४वा क्रमांक प्राप्त केल्यामुळे आता तिला आयएएस बनण्यापासून कुणी रोखू शकणार नाही.

डोळ्यांनी प्रांजल पूर्णपणे अंध असून पण तिच्या या यशाने प्रशासकीय व्यवस्थेचे डोळे उघडण्याचे काम केले आहे. जी व्यवस्था तिला अंध असल्याचे कारण दाखवून तिच्या हक्काची पोस्ट देत नव्हती, त्यांच्या नाकावर टिच्चून तिने पुन्हा यूपीएससीत घवघवीत यश मिळवले आहे. देशात यावर्षी १२४व्या क्रमाकांनी ती यूपीएससी उत्तीर्ण झाली आहे.

तिने मागच्या वर्षीही पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश संपादन केले होते. तिला ७७३ व्या क्रमाकांनुसार रेल्वे अकाऊंट सर्विस देण्यात आली होती. पण रेल्वेने तिच्या अंधपणाचे कारण सांगत तिला ताटकळत ठेवले. २७ वर्षांची प्रांजल ही मूळची जळगावची असून प्रांजल व्यवस्थेच्या अंसेदवनशीलतेचा अनुभव घेत असतानाही नाऊमेद झाली नाही. एकीकडे रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा माराव्या लागत असतानाच दुसरीकडे परीक्षेचीही चालू ठेवत तिने ही लढाई जिंकली आहे.

अनेक दिव्यांग आपल्या शारिरीक कमतरतांवर मात करत यूपीएससीचे शिखर पार करतात. पण बुद्धिमतेची चुणूक दाखवल्यानंतरही त्यांना हक्काच्या पोस्टसाठी झगडावे लागणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रांजलने वयाच्या ७ व्या वर्षी एका अपघातात आपली दृष्टी गमावली. पण हे संकटही तिच्या ध्येयाच्या आड येऊ शकले नाही.

Leave a Comment