क्रिकेटच्या तापाने फणफणले गुगलचे डुडल


नवी दिल्ली – अनेक दिवसांपासून जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत असून रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या ‘हाय-व्होल्टेज’ मुकाबल्यामुळे भारतीयांसाठी तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणखीनच विशेष ठरणार असल्यामुळे भारतात आजपासूनच चॅम्पियन्स ट्रॉफीचा फिव्हर पाहायला मिळत आहे.

याला अपवाद सोशल मीडियाही ठरलेला नाही. गुगलकडून हाच फिव्हर एन्कॅश करण्यासाठी नेहमीच्या क्रिएटिव्ह आणि मजेशीर पद्धतीने डुडल तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओ गेम किंवा मोबाईलवर खेळलेल्या क्रिकेट गेम्सप्रमाणेच या डुडलचे स्वरूप आहे. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला बॅट आणि चेंडूच्या सहाय्याने डिझाईन केलेला गुगलचा लोगो दिसेल. या लोगोवरील स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर क्रिकेटच्या सामन्याला सुरूवात होते. या सामन्यात किटक आणि गोगलगाय हे प्रतिस्पर्धी संघ आहेत.

या सामन्यात तुम्ही किटक संघाकडून फलंदाजी करू शकता. हा सामना आजुबाजूला शेत असणाऱ्या हिरव्यागार मैदानावर रंगलेला आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून जमलेल्या गोगलगायी आणि किडे डुडलची मजा आणखी वाढवतात. याशिवाय, पंच असलेली गोगलगायसुद्धा जमिनीखालून अंपायरिंग करते. तुम्ही आऊट झाल्यानंतर ही गोगलगाय आऊटचा फलक घेऊन जमिनीखालून वर येते. महत्त्वाची गोष्ट आऊट झाल्यानंतरही तुम्ही रिफ्रेश बटनावर क्लिक करून वारंवार फलंदाजी करू शकता. एकूणच हे संपूर्ण डुडल तुम्हाला रिफ्रेश करणारे आहे. त्यामुळे तुम्हाला एकदातरी या व्हर्च्युअल मैदानात उतरून खेळलेच पाहिजे.

Leave a Comment