‘एरॉबॅटिक्स भरारी’ घेणारी स्नेहा कुलकर्णी देशातील पहिली महिला


पुणे : श्वास रोखायला लावणारी प्रात्यक्षिके ‘एनडीए’च्या परेडमध्ये सारंग हेलिकॉप्टर्सच्या एरॉबॅटिक्स टीमने सादर केली. एका मराठमोळ्या मुलीनंही या प्रात्यक्षिकांमध्ये एक नवी भरारी घेतली.

या प्रात्यक्षिकांमध्ये स्क्वॉड्रन लीडर स्नेहा कुलकर्णीचाही सहभाग होता. कुठल्याही महिलेने देशातील हवाई कवायतींमध्ये सहभाग घेण्याची ही पहिलीच घटना आहे. स्नेहा कुलकर्णी ही हवाई कसरतींमध्ये भाग घेणारी पहिली महिला पायलट ठरली आहे.

एअरफोर्समधील सारंग हेलिकॉप्टर्सची टीम महत्त्वाची टीम समजली जाते. सारंग म्हणजे संस्कृतमध्ये मोर. सारंग हेलिकॉप्टर्स मोरांच्या नृत्याप्रमाणे ही लयबद्ध प्रात्य़क्षिक करतात. या टीमने ‘एनडीए’च्या पासिंग आऊट परेडच्या वेळी एकाहून एक सरस अशी अकरा प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके विंग कमांडर सचिन गद्रे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली. याच प्रात्यक्षिकांत स्नेहा कुलकर्णीचा महत्त्वाचा वाटा होता.

हवेत उंच भरारी घेऊन अशी प्रात्यक्षिके सादर करणे ही अभिमानाची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट होती. अशा प्रकारे प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झालेली मी पहिलीच महिला पायलट होते, त्यामुळे ही प्रात्यक्षिके यशस्वी झाल्यानंतर अनेक मुली माझ्याकडे एक प्रेरणा म्हणून पाहत असल्यामुळे जबाबदारीही निश्चितच वाढल्याचे स्नेहा म्हणते.

Leave a Comment