जगात भारताची स्थिती तीन वर्षात अधिक मजबूत झाली – अरुण जेटली


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत सरकारचे निर्णय, आर्थिक व्यवस्थेत झालेल्या बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. जेटली यांनी यावेळी तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची विश्वासार्हता पुनर्स्थापित केल्याचे सांगितले. देशात तीन वर्षांपूर्वी निर्णय घेणारे सरकार नव्हते. पण सध्याचे सरकार कठिण निर्णयही घेते. भारताची स्थिती जगात आता अधिक मजबूत झाली असल्याचेही जेटली म्हणाले.

एकूण गुंतवणुकीवर थेट विदेशी गुंतवणुकीतील सुधारणांचा मोठा प्रभाव पडला असून भ्रष्टाचाराची व्यवस्था सरकारने संपुष्टात आणल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाली असल्याचेही जेटली म्हणाले. पहिल्यांदाच देशात जीएसटी लागू करण्याच्या प्रक्रियेला खूपच पुढे नेले आहे. देशात करप्रणालीत विधेयक लागू झाल्यास मोठा प्रभाव जाणवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकारने नोटाबंदी करून रोकड अर्थव्यवस्था, समांतर अर्थव्यवस्थेला संपुष्टात आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नोटाबंदीचे तीन फायदे झाले आहेत. एक म्हणजे डिजिटायझेशनच्या दिशेने वाटचाल, करदात्यांच्या संख्येत वाढ आणि तिसरा फायदा म्हणजे रोकड व्यवहार आता सुरक्षित राहिले नाहीत, हा संदेश यातून गेला आहे, असेही जेटली म्हणाले.

Leave a Comment