व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्समध्ये भारत अग्रस्थानी


मुंबई : ‘व्हॉट्सअॅप’चे वेड इतर देशांच्या तुलनेत भारतीय यूझर्समध्ये जरा जास्तच असून भारत फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्समध्येही अग्रस्थानी आहे.

व्हॉट्सअॅपवरुन भारतीय यूझर्स दररोज ५ कोटी मिनिटे व्हिडिओ कॉल करतात. म्हणजेच भारतीय दररोज सरासरी ८ लाख ३३ हजार ३३३ तास वेळ व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर घालवतात. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे.

व्हॉट्सअॅपवरुन व्हिडिओ कॉलिंगला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंगला स्काईप, फेसबुक मेसेंजरचे व्हिडिओ चॅट, हाईक, वायबर, गुगलचे अॅलो आणि अॅपलचे फेसटाईम यांची टक्कर आहे. इंटरनेटचे घसरते दर आणि रिलायन्स जिओ सारख्या कंपन्यांनी दिलेला फ्री प्रमोशनल डेटा वाढत्या व्हिडिओ कॉलिंगसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

५.५ कोटी व्हिडिओ कॉल्स जगभरात दररोज केले जातात. जगात दररोज एकूण ३४ कोटी मिनिटे व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सवर बोलले जाटे. जगभरात व्हॉट्सअॅपचे २० कोटी मासिक अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. कोणतीही थर्ड पार्टी जाहिरात सुरु करण्याचा मानस नसल्याचे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअॅप कंपनी फेसबुकने विकत घेतली आहे. फोटो स्टोरी, जीआयएफ इमेज यासारखी फीचर्स अलिकडच्या काळात लाँच करण्यात आली आहेत. त्यानंतर डिजीटल पेमेंटच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment