१ जूनपासून फाटक्या नोटांवर शुल्क लागणार, पैसे काढणेही महागणार


नवी दिल्ली- पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करण्‍याची तयारी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) केली असून जीर्ण झालेल्या तसेच फाटलेल्या नोटा बॅंकेतून बदलणार्‍या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बचत खात्यातून पैसे काढणार्‍या खातेदारांकडूनही शुल्क आकारण्याची तयारी बँकेने केली आहे. एक जूनपासून बँकेचे नवे सेवा शुल्क लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, एसबीआयने काल गृहकर्ज पाव टक्क्याने (०.२५) स्वस्त करून आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली होती. महिलांना आता ८.३५ टक्के पुरुषांना ८.४० टक्के व्याजाने गृहकर्ज मिळणार आहे.

एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून फाटलेल्या तसेच जीर्ण झालेल्या नोटा बदलल्यास २ ते ५ रुपये शुल्क आकारले जाईल. २० पेक्षा जास्त नोटा ‍किंवा ५००० हजार रुपये मुल्य असलेल्या नोटा बँकेतून बदलल्यास संबंधित शुल्क आकारण्यात येईल. सेवाशुल्क वेगळा द्यावा लागेल. त्याचबरोबर २० पेक्षा कमी नोटा आणि ५००० रुपये मुल्य नसलेल्या नोटा बदलल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

आपल्या बचत खातेदारांनाही बँकेने झटका दिला आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा ‍व्यवहार केल्यास खातेदाराकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. विनामुल्य पैसे काढण्याची मर्यादा (फ्री कॅश विद्ड्रॉलची लिमिट) ४ राहील. यात एटीएमद्वारा करण्‍यात आलेल्या व्यवहाराचाही समावेश असेल. याचा अर्थ असा की, एखाद्या खातेदाराने ४ व्यवहार केल्यास त्याच्याकडून कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. मात्र, त्याने ४ पेक्षा जास्तवेळा व्यवहार केल्यास त्याच्याकडून शुल्क आकारण्यात येईल. यात एटीएमद्वारा करण्यात आलेल्या व्यवहारांचा समावेश असेल.

५ व्या व्यवहारापासून प्रति व्यवहार २० रुपये शुल्क आकरण्यात येईल. एसबीआयच्या खातेदाराने एटीएममधून व्यवहार केल्यास त्याच्याकडून प्रति व्यवहारावर १० रुपये शुल्क आकारले जातील. खातेदाराने इतर बॅंकाच्या एटीएममधून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास प्रति व्यवहार 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल. एक जूनपासून बँक केवळ रुपे डेबिट कार्ड विनाशुल्क असेल. मात्र, मास्टर आणि व्हिसा कार्डवर बॅंक शुल्क आकारणार आहे.

Leave a Comment