१५०० रूपयात ४जी स्मार्टफोन देणार ‘जीओ’!


सप्टेंबर २०१६ पासून भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार असून भारतात अवघ्या पंधराशे रूपयात ४जी फोन आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. यासंदर्भात चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी रिलायन्सचा करार झालेला आहे.

भारतातील मोबाईल क्षेत्रातील स्पर्धा स्वस्त ४जी फोननंतर आणखी तीव्र होईल. सध्या मायक्रोमॅक्स भारत १ नावाचा स्वस्त ४जी फोन बनवित आहे. या फोनची किमत १९०० रूपये असेल, असे सांगण्यात येते. त्याहीपेक्षा चारशे रूपयांनी स्वस्त फोन रिलायन्स बाजारात आणणार आहे.

मोबाईल फोनमधील प्रोसेसर्स स्प्रेडट्रम कंपनी बनविते. या कंपनीच्या नावावर फार मोठे काम जमा नाही. मात्र, ४ जी फोन अत्यंत स्वस्तात बनविण्याचा आशावाद कंपनीकडे आहे. पंधराशे रूपयांत ४जी फोन उपलब्ध करून देणारे आम्ही तंत्रज्ञान बनवितो आहोत. आम्ही आमच्या भागीदारांसमवेत या संकल्पनेचा प्रसार करतो, असे कंपनीचे भारताचे प्रमुख नीरज शर्मा यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले.

डेटा आणि बॅन्डविड्थचा रिलायन्स जीओचा प्रमुख व्यवसाय आहे. स्मार्टफोन बनविणे हा काही कंपनीचा व्यवसाय नाही. मात्र, स्वस्त ४ जी फोनमुळे आणखी ग्राहक रिलायन्स जीओकडे आकर्षित होतील, असा कंपनीला विश्वास आहे. स्वस्त फोन प्रामुख्याने निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या सोयीसाठी असेल. निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक केवळ स्वस्त डेटासाठी नवा फोन विकत घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे, हातात असलेल्या फोनच्या डेटा स्पीडवर ते काम चालवू शकतील. त्यांना रिलायन्स जीओकडे वळवायचे असेल, तर स्वस्त ४ जी फोन हाच मार्ग रिलायन्ससमोर आहे.

Leave a Comment