भारतीय शेअर बाजारातील विक्रमी घौडदौड कायम


मुंबई: भारतीय शेअर बाजारातील विक्रमी घौडदौड कायम असून आज सेन्सेक्सने ३०,००० अंशांची पातळी करीत नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टीनेदेखील आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे ९,३५० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पार केली आहे. रुपयाचे मूल्यदेखील जागतिक घडामोडी आणि कंपन्यांच्या मजबूत तिमाही निकालांमुळे मजबूत झाले आहे.

सेन्सेक्स सध्या १४९.८२ अंशांच्या वाढीसह ३०,०९३.०६ पातळीवर व्यवहार करत असून दुसरीकडे निफ्टी ९,३५०.७५ पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात मेटल क्षेत्रात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रात विशेष तेजीचे वातावरण आहे. याऊलट, आयटी, हेल्थकेअर, ऑईल अँड गॅस क्षेत्रात विक्रीचा किरकोळ दबाव दिसून येत आहे.

निफ्टीवर हिंडाल्को, विप्रो, गेल, टाटा स्टील आणि कोटक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर भारती इन्फ्राटेल, सिप्ला, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत. भारतीय रुपयाने आज २० महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६३.९३ रुपये प्रति डॉलर एवढे झाले आहे. आशियाई बाजारातील तेजीमुळेदेखील रुपयाला बळ मिळाले आहे.

Leave a Comment