वधू नाही मिळाली म्हणून केले रोबोटशी लग्न


बीजिंग: आगळे वेगळे लग्न करून चीनमधील एका इंजिनियरने खळबळ उडवून दिली आहे. एका रोबोटशी त्याने चक्क लग्न केले आहे आणि यामागचे कारण म्हणजे त्याला प्रेमात अपयश आले. तसेच जेव्हा तो वधू शोधत होता. तेव्हा त्याला वधू मिळाली नाही म्हणून त्याने चक्क रोबोटशी लग्न करण्याचा निश्चय केला.

चीनमधील या अजब इंजिनियरचे नाव झेंग जीयजीय असे आहे. तो ३१ वर्षांचा असून तो आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स एक्स्पर्ट आहे आणि तो झेजियांग प्रांतात राहतो. तो रोबोट तयार करणे आणि डिझाईन करण्यात तरबेज आहे. गतवर्षी त्याने एका स्त्री रोबोटची निर्मिती केली होती. यिंगिंग नावाची ही रोबोट चायनीज अक्षर आणि फोटो ओळखू शकते. याशिवाय ती चिनी भाषेतील काही सोप्या शब्दांचे उच्चारणदेखील करते. झेंगने पारंपरिक चिनी पद्धतीने या रोबोटसोबत लग्न केल्याचे माध्यमांत म्हटले आहे.

जेव्हा झेंगने या रोबोटशी लग्न केले तेव्हा या लग्न समारंभात झेंगची आई आणि काही मित्र उपस्थित होते. लग्न सोहळ्यात महिला रोबोट यिंगिंगने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ टाकून तिचे तोंड झाकण्यात आले होते. गर्लफ्रेण्ड मिळत नसल्याने हताश झालेल्या झिंगने रोबोटशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या एका मित्राने सांगितले. आपल्या रोबोट पत्नीला चालता यावे आणि घरातील कामात तिने हातभार लावावा यासाठी झेंग तिला अपग्रेड करणार आहे. त्याच्या लग्नाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबिय खूश आहेत.

हुवाई कंपनीत काम केलेल्या झेंगने २०१४ मध्ये या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानेतर त्याने ड्रीम टाऊन नावाच्या इंटरनेट व्हेंचरमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. त्याने गतवर्षाच्या अखेरीस एका रोबोटची निर्मिती केली होती आणि आपले उर्वरित आयुष्य स्त्री रोबोटसोबत घालविण्याचे ठरविल्याची माहिती एका मित्राने दिली. चिनी पारंपरिक पद्धतीने झेंग आणि रोबोटच्या लग्नाचे सर्व विधी पार पडले.

Leave a Comment