ट्विटचा प्रतिसाद महागात पडला


नामवंत स्तंभलेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांची टवाळी करण्यासाठी केलेल्या एक ट्विटमध्ये मुंबई पोलिसांच्या जाडीवर टिप्पणी केली होती. टिप्पणीचा तो विषय फार गाजला. कारण मुंंबईचा हेवी पोलीस बंदोबस्त या शब्दावर कोटी करताना शोभा डे यांनी एका लठ्ठमुठ्ठ पोलिसाचे चित्र जोडले होते आणि हा पोलीस भलताच जाड होता. मुंबई पोलिसांनी या ट्विटला चांगलेच उत्तर दिले. विनोद करणे आपल्यालाही आवडते परंतु मॅडमनी जे चित्र दाखवले आहे ते मुंबईच्या पोलिसाचे नाही असे उत्तरात म्हटले होते. त्यामुळे शोभा डे यांची बरीच शोभा झाली. त्यांना या उत्तरावर काही प्रत्त्युतर देता आले नाही. परंतु काही स्तंभलेखक कटिंग, पेस्टिंग करण्यात कसे हुशार असतात आणि कधीतरी त्यांची हुशारी कशी उघडी पडते हे या ट्विटवरून दिसून आले होते. शोभा डे या काही चांगल्या भावनेने ट्विटिंग करणार्‍या लेखिका नाहीत हे सर्वांना माहीतच आहे.

असे असले तरी त्यांच्या ट्विटला एक वेगळाच प्रतिसाद मिळाला. त्यांनी मुंबई पोलिसांचे म्हणून जे चित्र टाकले होते ते प्रत्यक्षात मध्य प्रदेशातल्या दौलतराम जोगावत या पोलीस निरीक्षकाचे होते आणि हे निरीक्षक साहेब प्रचंड लठ्ठ होते. आपल्या चित्रावरून बराच गोंधळ चालला आहे हे त्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी जाडी कमी करण्याचा निर्धार केला. खाण्यापिण्याचे पथ्य पाळून आणि व्यायाम करून जाडी कमी करता येते परंतु आता त्याच्या ऐवजी बॅरियॅट्रिक सर्जरीचा उपाय सापडला आहे. तेव्हा जोगावत यांनी मुंबईत येऊन सैफी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करून घेतली. शोभा डे यांचे ट्विट फेब्रुवारीत प्रसिध्द झाले होते आणि पोलीस निरीक्षक जोगावत हे शस्त्रक्रिया करून घेऊन ७ मार्चला मध्य प्रदेशातल्या नीमच या गावी पोहोचले होते. परंतु हे प्रकरण इथेच थांबणार नव्हते.

जोगावत यांना शस्त्रक्रियेनंतर काही त्रास व्हायला सुरूवात झाली आणि शस्त्रक्रियेनंतरच्या गुंंतागुंतीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉ. विपुल गर्ग यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यांना पुन्हा एकदा ऍडमिट करून इलाज करावे लागत आहेत. काल डॉ. गर्ग यांनी त्यांची प्रकृती तपासली तेव्हा ३६ तासांपासून काही खाल्ले नव्हते असे आढळले. दौलतराम जोगावत यांना इन्सुलिन इम्बॅलन्समुळे लठ्ठपणा आलेला होता. हा लठ्ठपणाचा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरची ही गुंतागुंत वाढली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या गुंतागुंतीमुळे पुन्हा एकदा शोभा डे यांचा तो ट्विट आणि शस्त्रक्रिया हे विषय पुन्हा चर्चेला आले.

Leave a Comment