हुल्लडबाजीचा फटका


संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या पद्मावती या चित्रपटाला राजस्थान पाठोपाठ कोल्हापुरातसुध्दा मोठा फटका बसला. या चित्रपटाच्या कथानकाला काही लोकांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाला विरोध केला होता. तसा दुसरा फटका कोल्हापुरात बसला. कोल्हापूरच्या मसाई पठारावर उभारण्यात आलेला या चित्रपटाचा एक सेट काही हुल्लडबाजांनी जाळून टाकला आहे. ही जाळपोळ करताना त्यांनी अन्य साहित्याची मोडतोड केली आणि काही वाहनांचेही नुकसान केले. चित्रपट निर्मात्याला या हिंसाचारामुळे ४ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल.

चित्रपटात दाखवणारा जाणारा इतिहास आम्ही म्हणतो तसाच दाखवला पाहिजे असा काही लोकांचा अट्टाहास आहे आणि त्यांच्यापुरते त्यांचे म्हणणे सत्य आहे. तेव्हा आम्हाला जे सत्य वाटते त्या सत्यासाठी आम्ही अशा प्रकारचा हिंसाचार केला तर तो गैर समजता कामा नये असे या प्रकारातील लोकांचे म्हणणे असते आणि अशा प्रकारे हिंसाचाराचे समर्थन करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये वाढत चालली आहे. त्यातूनच पुतळे हटवणे, पुतळ्यांची विटंबना करणे, रिक्षा चालकांवर हल्ले करणे हा आमचा हक्कच आहे आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही ते करत आहोत ते सत्यच आहे त्यामुळे आमची ही कृती समर्थनीयच समजली पाहिजे असा या नव्या राजकीय शैलीच्या समर्थकांचे म्हणणे असते. असाच एक प्रकार दोन दिवसांपूर्वी धुळ्यात घडला. तिथे एका सरकारी रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कशी ट्रीटमेंट केली पाहिजे आणि कोणी ट्रीटमेंट केली पाहिजे याबाबत त्यांचा काही आग्रह होता. तो न मानणार्‍या डॉक्टरांना रुग्णांच्या २०-२५ नातेवाईकांनी मरेस्तोवर मारहाण केली.

या मारामारीमुळे राज्यातली डॉक्टर मंडळी चिडली असून उद्या निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप होणार आहे. शुक्रवार दि. १७ रोजी राज्यातले मार्ड या संघटनेचे सदस्य असलेले डॉक्टर्स मास बंक आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनामुुळे शासकीय रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे मोठे हाल होणार आहेत. एका हुल्लडबाज गटामुळे राज्यातल्या सगळ्या शासकीय वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची वेळ आली आहे. पद्मावती चित्रपटाचा सेट जाळला त्यातली हुल्लडबाजी त्या चित्रपटाच्या निर्मात्यासाठी घातक ठरली आहे परंतु धुळ्यातल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे हुल्लडबाजीचे परिणाम सार्‍या महाराष्ट्रातल्या गरीब रुग्णांना भोगावे लागणार आहेत.

Leave a Comment