आर कॉमची होळीनिमित्त ‘जॉय ऑफ होली’ ऑफर


मुंबई – भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत रिलायन्स जिओने ४जी इंटरनेट सेवा मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली. वोडाफोन, आयडिया, एअरटेल या कंपन्यांमध्ये यामुळे विविध ऑफर्स देण्याची जणू स्पर्धाच लागली होती. अनिल अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनलाही रिलायन्स जिओच्या ऑफरचा फटका बसला. त्यामुळेच आता रिलायन्स कम्युनिकेशन्सने होळीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने होळीनिमित्त ग्राहकांना एक खास ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने ४जी ग्राहकांना अवघ्या ४९ रुपयांत १जीबी डेटा तर १४९ रुपयांत ३जीबी ४जी डेटा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या ऑफरला ‘जॉय ऑफ होली’ असे नाव दिले आहे. ही ऑफर २८ दिवसांसाठी वैध राहणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये कंपनीच्या नेटवर्कवर लोकल आणि एसटीडी कॉल्स पूर्णपणे मोफत असणार आहेत.

यासोबतच आरकॉम कंपनीने आपल्या ३जी आणि २जी डेटा ग्राहकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये ९९ रुपयांत अनलिमिटेड ३जी डेटा तर ४९ रुपयांत अनलिमिटेड २जी डेटा मिळणार आहे. ९९ रुपयांत आणि ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये इंटरनेटसोबतच २० रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. या दोन्ही या योजनेत व्हॉइस कॉल २५ पैसे प्रति मिनिट असेल. या योजनाही २८ दिवसांसाठी वैध असणार आहेत.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ इन्फोकॉम सुद्धा ५१ रुपयांमध्ये १जीबी ४जी डेटा प्लानची ऑफर आहे, पण या ऑफरची वैधता केवळ एका दिवसाची आहे. तर रिलायन्स कम्युनिकेशन्सची ‘जॉय ऑफ होली’ ही ऑफर २८ दिवसांसाठी वैध असून ४९ रुपयांत १जीबी ४ जी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

Leave a Comment