फकीरटोला- भिकार्‍यांचे गांव


बिहारच्या सितामढी जिल्ह्यातील फकीर टोला हे गांव भिकार्‍यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असून या १५० लोकवस्तीच्या गावातील प्रत्येकजण भीक मागूनच उदरनिर्वाह करतो. असेही सांगितले जाते की या गावात भीक मागण्याची परंपराच असून पिढ्यानपिढ्या ती चालत आली आहे. सुदैवाची बाब अशी की आता येथील नवीन पिढी मात्र भीक मागण्यापेक्षा मजुरी करण्यास प्राधान्य देताना दिसते आहे.

या गावातील लोक सकाळ झाली की भीक मागायला बाहेर पडतात ते सायंकाळी घरी परततात व त्यानंतर दिवसभरात गोळा झालेल्या भीकेतून सहभोजन करतात. या गावात हाच एकमेव व्यवसाय आहे. जुमराती शाह हे ६० वर्षांचे गृहस्थ या विषयी माहिती देताना म्हणाले माझे आजोबाही भीकच मागायचे. त्यानंतर परिवार वाढला त्याचीच आता वस्ती झाली आहे. आमच्या गावाला फकीर टोला हे नांवही भीक मागण्यामुळेच पडले आहे. या गावातील लोक शारीरिक दृष्या सक्षम आहेत. गावात कुणी अपरिचित आला तर सर्व गाव एकत्र गोळा होते व पैशांची भीक संबंधित पाहुण्याकडे मागितली जाते. येथील लोक भीक मागण्यासाठी थेट सीतामढीपर्यंतही जातात.

डुमरा या जवळच्या गावाचे बीडीओ संजय सिन्हा म्हणाले फकीरटोलातील जे लोक सरकारी मदतीसाठी पात्र आहेत त्यांना सरकारी मदत दिली जाते. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी जागृती अभियान राबविले जात आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा, पेन्शन, इंदिरा आवास योजना, पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा त्यांना पुरविल्या जात आहेत. या गावातील नवीन पिढी मात्र भीक मागण्याऐवजी मेहनत मजुरी करण्यास प्राधान्य देत असून गावाची भीक मागण्याची परंपरा बंद करावी अशा मताची आहे.

Leave a Comment