भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार मित्सुबिशीची हॅचबॅक कार


नवी दिल्ली – मित्सुबिशी कंपनीच्या ‘पजेरो’ या गाडीला जगभरात चांगली मागणी असून, या कारचे आकर्षण भारतीयांमध्येदेखील आहे. लवकरच पुन्हा एकदा ‘मित्सुबिशी’च्या कार भारतीय रस्त्यांवर पळताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपल्या नव्या कार उतरविण्याचा कंपनीचा मानस आहे. असे असले तरी, ‘हिंदुस्तान मोटर’शी जवळजवळ दोन दशकापासून सलग्न असणाऱ्या ‘मित्सुबिशी’ने विक्री पश्चात सेवा अतिशय खराब असल्याच्या कारणाने भारतातील आपल्या अनेक कारची विक्री बंद केली. परंतु, सध्याचे भारतीय कार बाजारातील वातावरण पाहता भारतात कार निर्माण करणाऱ्यासाठी चांगले भविष्य असल्याचे कंपनीचे संचालक आणि कार्यकारी अधिकारी कारलोस यांनी म्हटल्याचे ऑटोकार इंडियाने म्हटले आहे. हीच बाब लक्षात घेऊन ‘मित्सुबिशी’ भारतात नवीन कार लाँच करणार असल्याचे म्हणाले.

पण यासाठी किती कालावधी लागेल ते अद्याप कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. पण लवकरच या विषयीची माहिती समोर येणार असल्याचे बोलले जाते. ‘सीएमएफ-ए’ ‘हॅचबॅक’ प्रकारातील गाडी कंपनी भारतात आणणार असल्याची माहिती ‘सीईओ’नी दिली. सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या ‘रेनो क्विड’ आणि ‘दात्सुन रेडी-गो’ या ‘हॅचबॅक’ कारना ही कार टक्कर देईल. १० ते १५ वर्षापूर्वी भारतीय बाजारात दबदबा असलेली कंपनीची ‘सदान’ प्रकारातील ‘लान्सर’ कार नव्या रुपात भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. सुरुवातीला छोट्या कारद्वारे भारतीय बाजारात पाय ठेवून कालांतराने महागड्या गाड्या उतरविण्याचा कंपनीचा विचार असल्याचे समजते. असे असले तरी नव्याने सुरुवात करणे कंपनीसाठी कठीण असेल.

Leave a Comment