इसिसची व्याप्ती


लोकसभेच्या अधिवेशनात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारत देश आयसीसच्या कारवायांपासून तूर्त तरी मुक्त असल्याचे म्हटले होते. अजून तरी भारताच्या कोणत्या भागात आयसीसच्या स्वतःच्या किंवा आयसीसने फूस दिलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया झालेल्या नाहीत आणि त्या दृष्टीने काही हालचाली सुरू आहेत असेही काही दिसून आले नाही, असा निर्वाळा गृहमंत्र्यांनी दिला होता. परंतु काल घडलेल्या घटनांनी गृहमंत्र्यांचा निर्वाळा खरा नसल्याचे दिसून आले. भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट फार तीव्र स्वरूपाचा नव्हता. त्यामध्ये दहा प्रवासी जखमी झाले. त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामागे आयसीसचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पॅसेंेजर गाडीत झालेला स्फोट मध्य प्रदेशाच्या एका छोट्या स्टेशनजवळ झाला आणि स्फोट घडवणारा एक अतिरेकी उत्तर प्रदेशात लखनौ येथे पळाला असल्याचे लक्षात आले. तिथे तो एका घरात लपला होता. त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

या घटनेमध्ये दोन राज्यांचे पोलीस गुंतलेले आहेत. शिवाय राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीही या प्रकारात गुंतलेली आहे. त्यामुळे या तिघांकडून या सार्‍या प्रकाराबाबत काय सांगितले जाते यावर सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेमागे आयसीसचा हात असल्याचे तर म्हटलेच पण हे अतिरेकी मध्य प्रदेशात अजूनही काही ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट करणार होते. स्फोटांच्या त्या मोठ्या षडयंत्राचा कालचा स्फोट हा एक भाग आहे. किंबहुना त्या स्फोट मालिकेची चाचणी म्हणून मध्य प्रदेशात स्फोट घडवण्यात आला, असे त्यांनी म्हटले. खरे म्हणजे भारताच्या विविध राज्यातील काही दिशाभूल झालेले तरुण आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी मिळेल त्या मार्गाने सीरियाकडे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातल्या काही जणांना तिथंपर्यंत जाण्यात यश आलेले आहे. मात्र असा प्रयत्न करणार्‍यांमध्ये तेलंगणातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी आहेत. म्हणून तेलंगणाच्या गुप्तहेर खात्याने आणि दहशतवाद विरोधी पथकाने देशातल्या अशा संशयित तरुणांवर फार बारकाईने लक्ष ठेवलेले आहे. कालच्या लखनौच्या प्रकरणातील तरुणसुध्दा याचाच एक भाग म्हणून तेलंगण पोलिसांच्या रडारवर होते आणि त्यांच्यामुळेच ते पकडले गेले आहेत. मध्य प्रदेशात स्फोटाची घटना घडल्यानंतर १५ तासांच्या आत पोलीस या तरुणांपर्यंत जाऊन पोहोचले यामागे हे एक कारण आहे.

तेलंगणाच्या पोलिसांची या घटनेतली भूमिका पाहिल्यानंतर त्यांच्या म्हणण्याला महत्व येते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातले हे तरुण आयसीसच्या थेट संपर्कात नव्हते. त्यांना आयसीसकडून काही मदत मिळालेली नाही. किंबहुना त्यांनी घडवलेले स्फोट हा आयसीसच्या कारवाईचा भागही नाही. मात्र असे असले तरी या तरुणांना मिळालेली प्रेरणा आयसीसची आहे. आयसीसच्या तत्वज्ञानाची त्यांना भुरळ पडलेली आहे आणि त्यांनी स्वतःच स्वतःला आयसीसची माणसे म्हणून जाहीर केलेले आहे. अशा प्रकारे हे स्वयंघोषित आयसीस एजंट आहेत. तेलंगण पोलिसांचे म्हणणे असे असले तरी ते पूर्णपणे मान्य करता येईलच असे नाही. कारण घटनेमध्ये आढळलेल्या काही बाबी त्याला दुजोरा देत नाहीत. यातला सैफुल्ला हा तरुण स्फोट घडल्यानंतर लखनौकडे पळाला तिथे एका घरात लपून बसला. तो आयसीसचा एजंटच आहे असे मानून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला पण या प्रयत्नांना त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्याची लपण्याची पध्दत, गोपनीयता न ठेवण्याची पध्दत या गोष्टी पाहिल्या म्हणजे त्याला आयसीसचे प्रशिक्षण मिळाले होते असे मानता येत नाही.

तो आयसीसकडून प्रशिक्षण मिळालेला दहशतवादी असता तर त्याने या प्रकारे ही कारवाई केली नसती. हे खरे आहे परंतु त्याला ठार केल्यानंतर त्याच्याकडे मिळालेली शस्त्रे पाहिल्यानंतर तो आयसीसशी संबंधित नव्हता हे म्हणणे मान्य करता येत नाही. त्याच्याकडे सापडलेली पिस्तुले आणि अन्य घातक साहित्य फार किंमती आहेत. कोणा तरी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीशिवाय एवढी शस्त्रे एकत्र करणे अशा गरिबीतल्या मुलाला तरी नक्कीच शक्य नाही. तेव्हा तेलंगणाच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे दहशतवादी तरुण स्वतःच्या मनानेच कार्यरत झालेले होते आणि त्यांना आयसीसची मदत नव्हती असे गृहित धरून चालणार नाही. कारण हा सारा स्थानिक प्रकार आहे असे मानले तर पोलीस त्यांच्याविषयी बेसावध राहतील. हे तरुण आयसीसचेच हस्तक होते असे मानून त्याबाबतीत सतत सावध रहावे लागेल. कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारताचे स्थान या सगळ्या गोष्टी भारतात कोणत्याही क्षणी आयसीसच्या कारवाया होऊ शकतील अशाच आहेत. कोणत्याही क्षणी आयसीस भारतामध्ये आपल्या कारवाया सुरू करू शकेल. विशेषतः सीरियामध्ये अमेरिका त्यांच्या विरोधात जितक्या आक्रमक कारवाया करील तेवढी आयसीसच्या कारवाया भारतात सुरू होण्याची शक्यता आहे आणि तसे मानूनच आपल्याला चालावे लागेल. सारे काही आलबेल आहे असे मानून चालणार नाही.

Leave a Comment