‘गूगल ब्वॉय’ कौटिल्य रुग्णालयात भर्ती


नवी दिल्ली – गूगल ब्वॉय कौटिल्य पंडित याची तब्बेत ठिक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे वडिल सतीश शर्मा यांनी सांगितले की, कौटिल्यच्या छातीत वेदना होत असल्याने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील खेत्रपाल रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान, उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्याच्या चेस्टमध्ये थोडे इन्फेक्शन झाल्याचे सांगितले आहे.

वयवर्षे 10 असलेल्या कौटिल्यने जगभरातील कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे देऊन त्याने सर्वांना अचंभित केले होते. कोणत्याही देशाचा भुगोल कसा आहे, कोणत्याही देशातील प्रतिव्यक्तीचे उत्पन्न, विविध पदांवरील व्यक्तींची नावे, इंग्रजीतील अवघड शब्दांचे स्पेलिंग… आदी प्रश्‍नांची उत्तरे त्याने न अडखळता काही क्षणात दिली होती. कौटिल्यने अनेक टीव्ही चॅनेलवर लाईव्ह शोही केले आहेत. तसेच कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवरील अमिताभ बच्चनही कौटिल्यच्या स्मरणशक्तीमुळे अचंभित झाले होते.

कुरुक्षेत्र विश्‍वविद्यालयमधील विशेष तज्ज्ञांनी कौटिल्यचे परिक्षण केले होते. त्यांच्या मते, या बालकाचा आयक्यू सुमारे 130 आहे. महान वैज्ञानिक अलबर्ट आयस्टीन यांचा आयक्यू सुमारे 160-190 होता.

Leave a Comment