दत्तक मातृत्वाचा कायदा


चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने सरोगसीच्या पध्दतीने एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये मिळवली आहेत. या जुळ्यांचा जन्म झाला तेव्हा स्वतः करण जोहर उपस्थित नव्हता. या जुळ्याचा बाप करण जोहर आहे अशी नोंद त्यांचा जन्म झालेल्या अंधेरीच्या रुग्णालयामध्ये झाली आहे. करण जोहर अविवाहित असतानाही तो या दोन मुलांचा सांभाळ आता पिता म्हणून करणार आहे. या बाळांची आई कोण हे त्याने गुप्त ठेवलेले आहे आणि सिंगल पॅरेंटिंगचा तत्वाने ही मुले प्राप्त केली आहेत. यापूर्वी आमिरखान आणि शाहरूखखान यांचा विवाह झाला असतानासुध्दा आणि त्यांच्या पत्नी हयात असून प्रजननक्षम असतानासुध्दा त्यांनी सरोगसीच्या पध्दतीने मुले मिळवलेली आहेत. त्याही मुलांच्या जीवशास्त्रीय माता कोण हे त्यांनी गोपनीय ठेवलेले आहे.

अशा पध्दतीने विवाह न करता मुलांचा बाप होण्याची संधी साधणारा करण जोहर हा शेवटचाच पिता ठरावा असे वाटते. कारण अशा प्रकारे मुले प्राप्त करण्याची संधी त्यांना या संबंधातल्या आपल्या देशातल्या कायद्यातील त्रुटीमुळे मिळालेली आहे. दरम्यान आपल्या संसदेमध्ये या संबंधीचा कायदा करण्याबाबतचे विधेयक प्रलंबित आहे. त्याच्यावर अद्याप चर्चा व्हायची आहे. मात्र त्यामध्ये सिंगल पॅरेंटला सरोगसीच्या पध्दतीने मुले प्राप्त करता येणार नाहीत आणि या पध्दतीवर काही निर्बंध आणले जाणार आहेत. हा कायदा मंजूर झाल्यानंतर सरोगसीचा वापर करण्याची अनुमती केवळ विवाहित जोडप्यालाच राहणार आहे. केवळ माता किंवा केवळ पिता होणार्‍यांना ही अनुमती राहणार नाही.

विवाहित जोडप्यांनासुध्दा विवाहानंतर मुले होण्यासाठी प्रयत्न करूनही मुले होत नसतील तरच ही पध्दत वापरता येणार आहे. विवाहानंतर पाच वर्षे वैद्यकीय उपचार केले पण तरीही मुले झाली नाही असे त्यांना सिध्द करावे लागणार आहे. पाच वर्षात केलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे आणि सरोगसीशिवाय आता पर्याय नाही हे सिध्द करावे लागेल. तरच त्यांना सरोगसीची परवानगी मिळेल. अशा दाम्पत्यांनासुध्दा सरोगसीकरिता गर्भाशय भाड्याने घेण्यासाठी कोणालाही पैसे देत येणार नाहीत. पैशाच्या बदल्यात सरोगसी ही बेकायदा ठरणार आहे. सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पती-पत्नींच्या नात्यातील एखाद्या महिलेने स्वतःहून त्यांचा गर्भ पोटात बाळगण्याची तयारी दर्शवली असेल तरच ती सरोगसी कायदेशीर ठरणार आहे. हे विधेयक लवकरच मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment