रायगडाची डागडुजी


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या जाहीर सभांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही असे कधी झाले नाही. त्यांच्या या छत्रपतींच्या नामघोषावर काही लोकांनी टीका केली आहे. परंतु त्यालाही फडणविसांनी चोख उत्तर दिले. आम्हाला छत्रपतींमुळे प्रेरणा मिळते म्हणून आम्ही त्यांचे नाव घेतो. त्यामुळे दुसर्‍या कोणाच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही असे उत्तर देतानाच त्यांनी आपण शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी काय काय करत आहोत हेही सविस्तर सांगितले. त्यांनी मुंबईतल्या संकल्पित शिवस्मारकाचे जलपूजन करून घेतले. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. विशेषतः शिवसेना आणि मनसे यांनी केवळ जलपूजन करून नाटके कशाला करता असा सवाल केला आणि सरकारी पैशाची अशी उधळपट्टी करणे गैर असल्याचे म्हटले.

वास्तविक पाहता कोणते स्मारक उभे करण्यापूर्वी जलपूजन किंवा पायाभरणी समारंभ होतच असतो. तसा तो शिवस्मारकाचाही झाला. त्याला कोणी नाटक म्हणत असेल तर तो ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीचा प्रश्‍न आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी, समुद्र्रात असे स्मारक उभे करण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची डागडुजी करा असा उपदेश केला. खरे म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या हातात जी किंचित सत्ता आली होती त्या सत्तेचा वापर करून शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी काही केले नाही. शिवाय कोणत्याही किल्ल्याची डागडुजी केली नाही. कोणत्याही गोष्टीवर सरकारला उपदेश करणे किती सोपे असते हे राज ठाकरे यांना माहीत आहे.

आजवर सत्तेवर असलेल्या नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी काहीच केले नाही. तेव्हा आपण सरकारला किल्ल्याच्या डागडुजीबद्दल बोललो तर हे सरकार अडचणीत येईल असे राज ठाकरे यांना वाटले असावे. मात्र देवेंद्र फडणवीस हे कसलेले नेते आहेत असे दिसते. त्यांनी खरोखरच काल दिल्लीत जाऊन रायगडाच्या डागडुजीचा आणि सौंदर्यीकरणाचा आराखडा केंद्र्र सरकारकडून मंजूर करून घेतला. या कामावर ६०० कोटी रुपये खर्च करण्यास केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या कामाने शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांच्या डागडुजीच्या आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा प्रारंभ होणार आहे आणि येत्या काही वर्षात महाराजांचे मुख्य किल्ले जतन केले जातील अशी आशा आहे.

Leave a Comment