काही तरी चुकतेय


शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि आदिवासी बालकांचे कुपोषण हे दोन विषय कायमचे चर्चेत असतात. त्यांचे विश्‍लेषण करून सरकारही थकले आणि तज्ज्ञांच्या तर हयाती वाया गेल्या. पण या दोन प्रश्‍नांचे नेमके उत्तर मिळत नाही आणि त्यावर इलाज काही सापडत नाही. असे का होते ? किती तज्ज्ञ झाले, किती अभ्यास मंडळे नेमून झाली आणि त्यातल्या कितींचे अहवाल पडून आहेत. किती आयोग चौकशा करून थकले आणि त्यांच्या शिफारसींचे चावून चोथे झाले. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चाही संपत नाही आणि संख्याही कमी होत नाही. नेमके काय चुकते हेच कळेनासे झाले आहे. एक बाब सांगितली जाते की शेतकर्‍यांच्या आत्महत्या असल्या तरीही त्यांचा अभ्यास करणारे किवा त्यांची चौकशी करण्यासाठी जे लोक नेमले जातात ते शेतकरी नसतात. त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांचे हे नेमके दुखणे काय आहे याचा बोध होत नाही. म्हणून कितीही पॅकेजे दिली तरी ही समस्या काही सुटत नाही. आता असे वाटायला लागले आहे की, अभ्यास आणि चौकशा करण्याची दिशाच बदलली पाहिजे.

गेल्या आठवड्यात शेतकर्‍यांचे नेते राजू शेट्ठी यांनी एका मोठ्या नामांकित दैनिकात यावर लेख लिहिला आहे. बर्‍याच दिवसांनंतर असा मोठा आणि सविस्तर परंतु अनेक पैलू तपासणारा लेख वाचायला मिळाला. या लेखात राजू शेट्टी यांनी साहित्यिकांनाही लाथाडले आहे. लेखक आणि साहित्यिक शेतकर्‍यांच्या दुस्थितीचे वर्णन करतात पण या दुस्थितीवर उपाय सांगत नाहीत या विषयी त्यांनी खेद व्यक्त केला. ही तर वस्तुस्थिती आहे. अर्थात गंमतीचा भाग असा की, स्वत: राजू शेट्टी यांनी आपल्याही लेखात नेमकेपणा टाळला आहे आणि त्यांनीही कसला उपाय सुचविला नाही. त्यांच्या सारखे लेखक आणि कार्यकर्ते यावर आपली मते मांडतात पण नेमक्या कारणांचा त्यांनीही शोध घेतलेला नसतो. यावर मते व्यक्त करताना राजू शेट्ठी यांनीच दिलेली एक आकडेवारी या ठिकाणी नमूद करायला हवी. देेशभरात शेतकर्‍यांच्या ज्या आत्महत्या होतात त्यातल्या ३४ टक्के आत्महत्या केवळ महाराष्ट्रात होतात. त्यातल्याही बहुसंख्य आत्महत्या विदर्भात आणि मराठवाड्यात होतात. या दोन भागांत पहिला दुसरा क्रमांक काढायचा झाला तर विदर्भाचा पहिला आणि मराठवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. यंदा मराठवाड्यातही आत्महत्या मोठ्य़ा संख्येने झाल्या पण विदर्भात आत्महत्यांचे प्रकार मराठवाड्याच्या आधी सुरू झालेले आहेत. ही आकडेवारी पाहून आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे.

विचारवंत असोत की नेते असोत त्यांचे आत्महत्यांचे विश्‍लेषण त्याच त्या मुद्यांभोवती फिरताना दिसते. हरित क्रांती, संकरित बियाणांचा वापर, वाढलेले खर्च आणि कमी झालेले भाव या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात असे निदान सगळेच करतात. या सगळ्या शेतकर्‍यांच्या समस्या आहेत. त्यांचे निवारण झालेच पाहिजे पण ही कारणे शेतकर्‍यांंच्या दु:स्थितीची आहेत की आत्महत्यांची आहेत ? ती कारण शेतकर्‍यांच्या गरिबीची आहेत पण असे आहे तर केवळ विदर्भातला आणि मराठवाड्यातलाच शेतकरी आत्महत्या का करतो ? संकरित बियाणे, रासायनिक खते आणि शेतकर्‍यांचे फुगलेले खर्च हे काय केवळ विदर्भातल्याच शेतकर्‍यांचेच प्रश्‍न आहेत का ? महाराष्ट्राच्या अन्य भागात आणि अन्य राज्यात संकरित बियाणे वापरले जात नाही का ? त्यांच्या शेेतात रासायनिक खतांचा वापर होत नाही का ? उलट रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत मराठवाडा आणि विदर्भ हे भाग मागे आहेत. तेव्हा सार्‍या देशाला भेडसावत असलेल्या या समस्या विदर्भ- मराठवाड्यातल्याही शेतकर्‍यांना भेडसावत आहेतच पण त्यांच्या आत्महत्यांचे ते कारण नाही.

सरकारची शेतीमालाच्या किंमती ठरवून देण्याच्या बाबतीत होत असलेली उपेक्षेची वागणूक, दलालांकडून होत असलेली लूट, सरकारची शेतीतली कमी होत असलेेली गुंतवणूक, कर्जे माफ न करणे, शहरातल्या ग्राहकांचा शेतीकडे आणि शेतकर्‍यांकडे पाहण्याचा हिणकस दृष्टीकोन याही कारणांची चर्चा सतत होत असते पण या तर सार्‍या देशातल्याच शेतकर्‍यांच्या समस्या आहेत. त्या काही विदर्भ मराठवाड्यातल्याच शेतकर्‍यांना सतावणार्‍या समस्या नाहीत. मग केवळ याच दोन भागांत आत्महत्या का वाढत आहेत. याचा प्रदेशनिष्ठ विचार केला जाण्याची गरज आहे तरच काही तरी उपाय सापडतील. सरकार हेही एक कारण आहे. त्यावरही चर्चा होते पण सरकार बदलले तरीही आत्महत्या का कमी होत नाहीत ? महाराष्ट्रातले सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते शेतकर्‍यांचे वैरी आहे असे मानले तरीही कोकणाला हेच सरकार आहे आणि प. महाराष्ट्राचे सरकारही तेच आहे मग आत्महत्या केवळ याच दोन भागात का ? समस्येचे उत्तर शोधताना सर्वांना दोषी धरू झाले. शहरातले ग्राहक दोषी, सरकार दोषी असे सर्वजण त्याच्या जीवावर उठले आहेत असे मानून विश्‍लेेषण करून झाले आहेत आता जरा दिशा बदलून आपण शेतकरीही या स्थितीला जबाबदार असू शकतो का याचाही विचार केला पाहिजे पण विचारांची ही दिशा कोणाला आवडणार नाही. तशी ती आवडली नाही तरीही कधी तरी कटूपणा स्वीकारून ती केली पाहिजे.

Leave a Comment