जगण्याची व्याख्या बदलतेय


वृत्तपत्रांत सध्या फार विचित्र बातम्या वाचण्यात येत आहेत. एका गावात एक बापाने आपल्या पोटच्या मुलाचा खून केला. एका गावात एका वृद्धाने आपल्या ६० वर्षे वयाच्या पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप ठेवून तिचा खून केला. तिचे मुंडके कापले आणि कापलेले मुंडके घेऊन तो रस्त्याने चालत पोलीस ठाण्यात आला. तिथे त्याने स्वत:हून गुन्हा कबूल केला आणि कापलेले मुंडके ठाणे अंमलदाराच्या टेबलावर ठेवून आपली कहाणी सांगून टाकली. एका कुटुंबातले आईबाप आणि तीन मुली अशा पाच जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. एका बापाने आपल्या आंतरजातीय विवाह करणार्‍या मुलीला कुर्‍हाडीचे घाव घालून ठार मारले. किती तरी विकृती आणि मनाचे आविष्कार. लोक असे वेडे का होतात आणि आपल्या हातून काय घडत आहे याचा काहीच कसा विचार करीत नाहीत याचे आश्‍चर्य वाटते. भल्या भल्या मानसशास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकेल अशा या घटना आहेत. सामान्यांची तर अशा हकिकती ऐकून मती गुंग होऊन जाते.

या लोकांच्या मनाचा विकास झालेला नसतो. त्यांच्या यशाच्या आणि प्रतिष्ठेच्या काही वेगळ्याच कल्पना असतात. आपला मुलगा आपल्या ऐकण्यात असणे हेच आपल्या आयुष्याचे सार्थक असते, इतर सर्वांची मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत असतात असा त्यांचा समज असतो. मग आपलाच दिवटा आपले ऐकत कसे नाही याचा त्यांना भयंकर राग येतो. आपला मुलगा आपले ऐकत नाही म्हणजे आपले आयुष्य अगदीच वाया गेले अशी त्यांची समजूत असते. अशा स्थितीपेक्षा दुसरी काही स्थिती असू शकते हेच त्यांना माहीत नसते. दृष्टी व्यापक झालेली नसते. आपल्या आयुष्याचे सार्थक नेमके कशात आहे याचा विचार करण्याची आणि त्या सार्थकाच्या कल्पनेचे उन्नयन करण्याची मानसिक अवस्था त्यांच्यात विकसित झालेली नसते. त्यामुळे असा मुलगा असला काय की नसला काय यात काही फरक पडत नाही अशी एक दृढ भावना झाली की त्यांच्या मनावर खून चढायला लागतो. मनाचा ताबा अविचाराने घेतला की हातून काही तरी वेगळे आणि चुकीचे होत आहे याचे भान त्यांना रहात नाही. अशा प्रसंगात घटना घडेपर्यंत आरोपीच्या मनावर त्याचाा ताबा नसतो असे म्हटले जाते. मनाच्या एका अविचाराच्या झटक्यात आपल्या हातून असे कृत्य घडून गेले याचे त्यांना नंतर वाईट वाटते. घटना घडताना मनावर ताबा नसतो तो घटना घडून गेल्यानंतर येतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. घडणारी घटना घडून गेलेली असते. नंतर पश्‍चात्ताप करून काही फायदा नसतो.

असे लोक घटना घडेपर्यंत बेभान झालेले असतात पण काही लोक जातीच्या अभिमानाच्या नशेत कायमच राहतात. त्यांच्या मनातला जातीच्या श्रेष्ठत्चाच्या भावनेने मनाच्या विवेकाच्या स्थानाला एवढे वेढलेले असते की ते सदोदित आपल्या जातीच्याच अहंकाराला गांेंजारत राहतात. हरियाणातल्या खाप पंचायतीचे एक प्रकरण याला साक्षी आहे. एका गावातल्या दोन भिन्न जातींच्या मुलाने आणि मुलीने समाजाला न जुमानता लग्न केले. त्यावर खाप पंचायतीने या दोघांनाही ठेचून काढले आणि नंतर झाडाला लटकावून त्यांना फाशी दिली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आणि या खाप पंचायतीच्या सदस्यांवर खटले दाखल केले. त्यातल्या काही लोकांना फाशीची सजा सुनावण्यात आली. या लोकांनी शिक्षा सुनावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याला जातीच्या स्वाभीमानासाठी फाशीची शिक्षा झाली असल्याचा आनंद व्यक्त केला. आपल्या आयुष्याचे सार्थक असे जातीसाठी काही तरी करण्यातच आहे असे त्यांनी म्हटले. जातीचा एवढा अभिनिवेश असल्यावर या खाप सदस्यांना आपल्या स्वत:च्याच मुलीने परजातीतल्या मुलाशी विवाह केला तर किती राग येत असेल?

अशा एखाद्या नराधम पित्याने आपल्या अशा मुुलीला आपल्या मनाप्रमाणे लग्न करण्याचा आग्रह धरला असेल आणि तो त्या मुलीने मानला नसेल तर ते दोन पिढ्यातल्या वैचारिक संघर्षाचेच लक्षण आहे म्हणून गप्प बसणे त्यांना शक्यही नाही. ते अशा जात बुडवायला (?) निघालेल्या मुलाला शक्य तेवढ्या लाडात वाढवीत असतील आणि त्याला नकार पचवायला शिकवीत नसतील तर तो मुलगा कसल्याही लहान कारणावरून आत्महत्या करू शकतो. आपल्या मनासारखे होत नसेल तर तो घराला आग लावायलाही मागेपुढे पहात नाही. अशा अनेक विकृतींचे दर्शन आपल्याला होत असतेच पण या मागे कारण काय आहे ? याचा आपण फार बारकाईने विचारही करीत नाही आणि त्यामागच्या मूलभूत तत्त्वाचीही आपल्याला कल्पना नसते. या मागे असते आजच्या जगातले तणावपूर्ण जगणे. सध्याचा माणूस अनेक लहान मोठे तणाव घेऊन जगत आहे. त्या तणावाची त्यालाही कल्पना नसते. तो तणाव त्याच्या तनामनाला डाचत रहातो. तो मनात साचत जातो. या डाचण्यामुळे त्याला काही मानसिक विकृती सतावत राहतात. अशा वेळी तो आत्महत्या तरी करतो किंवा अन्य कोणाचा तरी घात करतो. जीवनात आपण आनंदी राहिले पाहिजे असेच त्याचे म्हणणे असतेपण त्याचे तंत्रही त्याला अवगत नसते आणि आनंदाची निखळ व्याख्याही तो जाणत नसतो. त्यांना ती शिकवली पाहिजे.

Leave a Comment