
प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी वाहन उद्योगात इको फ्रेंडली वाहनांची चलती असली व इलेक्ट्रीक वा अन्य स्वच्छ इंधनांवर चालणार्या कार्स बाजारात आल्या असल्या तरी इलेक्ट्रीक बाईक मोठ्या प्रमाणावर अजून तरी आलेल्या नाहीत. मात्र स्वच्छ इंधनावर चालणारी आणि वेगाशी कोणताही समझोता न करणारी पूर्णपणे इलेक्ट्रीक बाईक जो हॅमर जे ११ बाजारात दाखल झाली आहे. २०० किमी रेंजमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.
जो हॅमर जे ११- वेगवान इलेक्ट्रीक बाईक
या बाईकसाठी १२.६ केडब्ल्यूएच ची लिथियम इयॉन बॅटरी दिली गेली आहे. या बॅटरीचे वैशिष्ठ म्हणजे ४ वर्षे किंवा किमान २ लाख किमी रनिंग नंतरही या बॅटरीची क्षमता ८५ टक्कयांपर्यंत राहते. बाईकचे डिझाईनही अतिशय देखणे असून तिला दोन आर्म्स स्टीरिंग व्हील दिले गेले आहे. वेगाच्या बाबतीत ही बाईक उत्तम आहे शिवाय तिचा लूक अन्य बाईकपेक्षा खूपच वेगळाही आहे. ही बाईक चार्ज करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण तिला अॅडव्हान्स बॅटरी पॅक दिला गेला आहे. ९० मिनिटात बॅटरी ८० टक्के चार्ज होते. दीर्घ काळ चालविणे व आरामात बसून चालविणे अशा दोन्ही ड्रायव्हिंग मोडसाठी वेगवेगळे सिटींग पर्याय दिले गेले आहेत.
कंपनीने दोन मॉडेलमध्ये ही बाईक बाजारात आणली आहे. ५० किमी रेंजसाठी तिची किंमत २३ हजार युरो तर २०० किमी रेंजसाठी २५ हजार युरो अशी आहे.
