घरगुती सिलेंडरचे ऑनलाईन पेमेंट करा आणि मिळवा पाच रूपयांची सूट!


नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली असून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची ज्यामुळे बचत होणार आहे. सरकारने देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याचा मार्गात आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता घरगुती सिलेंडरच्या (एलपीजी) ऑनलाइन पेमेंटवर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाइन व्यवहारांसाठीही अशाचप्रकारची सूट देण्यात आली होती.

प्रत्येक घरगुती सिलेंडरची खरेदी आणि पैसे ऑनलाइन भरल्यास पाच रूपयांची सूट जाहीर करण्यात आली. सरकारने याआधी तेल कंपन्यांना कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना ०.७५ टक्के सूट देण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये आता एलपीजीची भर पडली आहे. सिलेंडरची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना किती सूट मिळाली, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

मागील महिन्यात केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरात २ रुपये ७ पैशांची वाढ जाहीर करण्यात आली होती. तसेच विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचे दर ३.७ टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत आहेत.

Leave a Comment