जगातील सर्वात लांब मार्गाची मालगाडी चीनहून लंडनला रवाना


चीनने रेल्वे वाहतुक क्षेत्रात नवे रेकॉर्ड नोंदविले असून दीर्घ पल्लयाची पहिली मालगाडी सुरू केली आहे. ही गाडी चीनमधून ब्रिटनला जाणार असून हा १२ हजार किमीचा प्रवास करण्यासाठी तिला १८ दिवस लागणार आहेत. झेजियांग आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही मालगाडी कझाकिस्तान, रशिया, बेलारूस, पोलंड, जर्मनी, बेल्जियम व फ्रांस या देशांचा प्रवास करत लंडनला पोहोचणार आहे.

जगातील सर्वात दीर्घ पल्लयाची ठरलेल्या या मालगाडीमुळे सात देशांच्या अर्थव्यवस्था जोडल्या जाणार आहेत. चायना रेल्वे कार्पोरेशनने घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, बॅगा, सुटकेसेस अशा वस्तूंची आयातनिर्यात करण्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे वरील सात देशांबरोबरचा व्यापार वाढण्यास मदत होईलच पण या देशांबरोबरचे संबंध अधिक मजबूत होणार आहेत. या देशांची हवाई मार्गाने व्यापार करताना येणार्‍या खर्चाच्या निम्माच खर्च या मालगाडीमुळे येणार आहे व समुद्री मार्गापेक्षा निम्म्या वेळातच माल या देशांत पोहोचू शकणार आहे.

चीनला गेल्या वर्षात २०१४ च्या तुलनेत निर्यातीत घट सोसावी लागली आहे तसेच आर्थिक वाढीचा वेग मंदावल्यानेही व्यापारात मोठे नुकसान सोसावे लागते आहे. यामुळे युरोप बरोबरचा व्यापार व्यवसाय वेगाने विस्तार करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

Leave a Comment