
जपान हा मुळातच जगभरातल्या पर्यटकांना भुरळ घालणारा देश. मानवनिर्मित तसेच नैसर्गिक आश्चर्यांनी, विविध चाली रूढी, परंपरांनी भरलेला हा देश प्रवासासाठीही आदर्श देश आहे. येथील नागरिक आपल्या देशातील प्रत्येक वस्तूची काळजी फुलांसारखी घेतात व त्यामुळे हा देश अगदी टवटवीत राहिला आहे. आजकाल जपानमध्ये विशेष प्रकारे डिझाईन केलेले बसस्टॉप केवळ प्रवासी लोकांचेच नाही तर पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहेत.
सुंदर जपानमधील आकर्षक बसस्टॉप

बसची वाट पाहणे हे तसा कंटाळवाणा प्रकार. त्यातून आपल्या देशातले छप्पर उडालेले, मोडक्या आसनांचे बसस्टॉप नजरेसमोर आले तरी प्रवासाचा निम्मा उत्साह मावळतो याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. त्या पार्श्वभूमीवर जपानमधले हे बसस्टॉप खूपच आकर्षक आहेत. केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही येथे बसची वाट पाहण्यास कंटाळा येण्याची शक्यता नाही.

१९९० साली ट्रॅव्हल एक्स्पो शो मध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे रसरशीत फळांच्या आकारांचे बसस्टॉप बनविले गेले होते व आता १६ ठिकाणी ते स्थापन केले गेले आहेत. यात स्टॉब्रेरी, कलिंगड, खरबूज अशा विविध फळांचा समावेश आहे.
