बँकेमध्ये जमा करावी लागणार गृहिणींकडून वर्षाकाठी जमा केली जाणारी रक्कम


नवी दिल्ली – भारतीय गृहिणींना आपल्या पतीच्या पगारातून काही रक्कम गुपचूप बाजूला काढून ठेवण्याची सवय असते. या ‘गुपचूप’ रकमेची मोजदाद होणे आवश्यक असल्याचे मत नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी व्यक्त केल्यामुळे आगामी काळात भारतीय गृहिणींच्या बचतीकडे सरकारची नजर वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय गृहिणींच्या या बचतीचे नेमके प्रमाण किती आहे, हे समजण्यासाठी काहीतरी ठोस पद्धत असली पाहिजे. गृहिणींकडून वर्षाकाठी जमा केली जाणारी ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा होणे गरजेचे आहे, असे पनगारिया यांनी म्हटले आहे.

याशिवाय, आगामी काळात सरकारकडून मोठ्याप्रमाणावर करदात्यांच्या उत्त्पन्नाची तपासणी होणार असल्याचेही अरविंद पनगारिया यांनी सुतोवाच केले. भारतात सध्याच्या घडीला ४० कोटी बँक खातेधारक असून यापैकी एक टक्का खातेधारकांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करायची झाल्यास ते प्रमाण ४० लाख इतके होते. सध्या आयकर विभाग वर्षाकाठी ३.५ लाख करदात्यांच्या उत्त्पन्नाची तपासणी करते. मात्र, यंदा निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे बँकांच्या माध्यमातून आयकर विभागाकडे बँक खातेधारकांची माहिती मोठ्याप्रमाणावर जमा झाल्यामुळे यंदा आयकर विभागाकडून तितक्याच मोठ्याप्रमाणावर तपासणी होण्याची शक्यता असून दुसऱ्या बाजूला पनगारिया यांनी यामुळे इन्स्पेक्टर राज निर्माण होण्याची आणि उद्योगांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

Leave a Comment