निधी तिवारीने केला उणे ५९ अंश सेल्शिअस गोठवणा-या थंडीत प्रवास


कडाक्याच्या थंडीत रोज जगण्यासाठी सैबेरियातील नागरिकांची धडपड सुरू असते. येथे थंडीतही पारा उणे ५० अंश सेल्शिअसच्याही खाली असतो. निधी तिवारी ही अशा कडाक्याच्या थंडीत १३ दिवस प्रवास करणारी पहिली भारतीय महिला ठरली असून तिने आपल्या साहसी प्रवासाला सैबेरियाच्या याकुत्स्क गावातून सुरूवात केली अन् गोठवणा-या थंडीत ती तग धरून राहिली.

भारताची निधी तिवारी हिचे नाव साहसी प्रवास करणा-या काही मोजक्या लोकांमध्ये आता गणले जाऊ लागले. तिने भारताच्या अनेक दुर्गम भागात आपली जीप घेऊन प्रवास केला. तिने काही दिवसांपूर्वी आपल्या दोन मैत्रिणींसोबत मिळून तीन महिन्यांत दिल्ली ते लंडन असा प्रवास केला होता. एकूण २४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला ९७ दिवस लागले होते.

यानंतर सैबेरियातल्या अत्यंत कडाक्याच्या थंड प्रदेशात तिने एकटीने प्रवास केला. तिने तेरा दिवस उणे ५९ अंश सेल्शिअस तापमान असलेल्या सैबेरियाच्या अनेक गावांतून प्रवास केला. हा प्रवास पूर्णपणे जोखमीचे होते. कारण येथे जीवन मरणाचा प्रश्न होता. निधीने ‘हफिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की प्रवास खूपच रोमांचकारी होता. येथे प्रत्येक गावातील तापमान हे उणे ५० अंश सेल्शिअसच्याही खाली होते. रात्रीचे तर सोडाच पण दिवसाही इतके दाट धुके असायचे की काहीच दिसायचे नाही. त्यातून रस्त्यावर बर्फ आणि निसरडे रस्ते होते यात एक छोटीशी चूक आणि मृत्यूने तुम्हाला मिठी मारलीच समजा. वयाच्या अकराव्या वर्षी निधीने हिमालय सर केला होता. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी सफर करण्याची प्रेरणा आपल्याला आईपासून मिळाली असेही तिने सांगितले. कडाक्याच्या थंडीत सैबेरियामध्ये प्रवास करणारी निधी ही पहिली भारतीय महिला ठरली.

Leave a Comment