नासाच्या छायाचित्रकाराने टिपले सूर्यासमोरून मार्गक्रमण करत असतानाचे छायाचित्र


वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सूर्यासमोरून मार्गक्रमण करत असतानाचे छायाचित्र नासाच्या एका छायाचित्रकाराने टिपले असून अवकाश स्थानकाचा वेग त्या वेळी ताशी २८९६८ कि.मी. होता. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे हे विलोभनीय छायाचित्र नासाचे छायाचिकार नोएल कोस्की यांनी टिपले असून १७ डिसेंबरला सूर्यासमोरून मार्गक्रमण करता असताना ते कॅमेराबद्ध केले आहे. या घटनेची अनेक छायाचित्रे कोस्की यांनी टिपली, त्यातील दहा छायाचित्रे एकत्र करून संकलित दृश्य तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे मानवाने निर्माण केलेले अवकाशातील सर्वात मोठे वस्तीस्थान आहे तेथे अवकाशवीरांचे वास्तव्य सतत असते. तेथे अनेक वैज्ञानिक प्रयोगही केले जातात. अवकाशस्थानकाचे सूर्यासमोरून जातानाचे छायाचित्र सोपे नसते, पण ते टिपण्यात नासाच्या छायाचित्रकाराला यश आले आहे. त्यासाठी बरेच नियोजन लागते असे ‘टेक टाइम्स’ने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे ३३० ते ४३५ किलोमीटर उंचीवरून फिरत असते, त्यामुळे ते उच्चशक्ती दुर्बीणीशिवाय दिसू शकत नाही. पृथ्वीच्या सापेक्ष अवकाश स्थानक नेमके कुठे आहे हे अवकाश निरीक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

Leave a Comment