करबुडव्यांच्या चुकीला माफी नाही – जेटली


फरिदाबाद – भारतीय महसूल सेवेच्या ६८ व्या तुकडीच्या व्यावसायिक प्रशिक्षण उद्घाटन समारंभावेळी अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी सरकारने लागू केलेले कायदेशीर कर भरणे हे नागरिकांचे कर्तव्यच आहे, जो या कर्तव्यात दिरंगाई करेल त्याला क्षमा केली जाणार नसल्याचे म्हटले. देशात येणाऱ्या काही दशकांमध्ये असे करदाते तयार झाले पाहिजे जे स्वयंफूर्तीने कर भरतील असे जेटली म्हणाले.

करदात्यांसाठी सुलभ वातावरण भारतामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचेही जेटली म्हणाले. कराचे विविध स्तर देशात आहेत, कर कमी करुन स्वयंस्फूर्तीने कर भरण्यास प्रोत्साहन दिल्यास भारत जागतिक स्पर्धेत टिकू शकेल असे जेटली यांनी म्हटले. तुम्ही येणाऱ्या काळात आयकर विभागाचे अधिकारी होणार आहात तेव्हा तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल की स्पर्धा केवळ स्थानिक स्वरुपाची नाही तर जागतिक स्वरुपाची आहे. या स्पर्धेत जर आपल्याला टिकायचे असेल तर अशी कर प्रणाली तयार व्हायला हवी जिथे स्वतःहून कर भरणाऱ्यांना सवलत मिळायला हवी असे अरुण जेटली यांनी म्हटले.

सरकारचा शेअर बाजाराच्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या व्यवहारांवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा म्हटले. शेअर बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईमध्ये केलेल्या भाषणानंतर नकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले. अरुण जेटलींनी त्यावर स्पष्टीकरण दिले. अनेकांनी अतिरिक्त कर लागण्याची भीती पंतप्रधानांच्या भाषणानंतर व्यक्त केली परंतु ही भीती निरर्थक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

सेबीच्या कार्यक्रमात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले होते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करुन नफा कमवणारे अनेक लोक आहेत परंतु ते कर भरण्याच्या बाबतीत उदासीन असतात. तसेच शेअर बाजारात अनेक गैरव्यवहार होत आहेत तेव्हा सेबीला जागरुक राहावे लागेल असे पंतप्रधानांनी म्हटले होते. काही लोकांनी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असे त्यांनी म्हटले. सरकारचा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या लाभांवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार नसल्याचे अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. शेअर बाजारावर दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी देशाच्याही आर्थिक उन्नतीबाबत विचार करावा असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले होते. त्यानंतर बाजारात उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यावरच जेटलींनी डिजीधन मेळाव्याच्या वेळी देखील खुलासा केला होता.

Leave a Comment