
रत्नागिरी : पंख असलेले दोन दुर्मिळ ‘फ्लाईंग फिश’ मासेमारी करताना रत्नागिरीतील गुहागरच्या असगोली येथील मच्छिमारांना जाळयात सापडले. हा मासा समुद्रावर आलेल्या पर्यटकांना दाखविल्यानंतर मच्छिमारांनी त्याला समुद्रात सोडून दिले. रत्नागिरीच्या समुद्रात अनेक वेळा या प्रजातीचे उडणारे मासे आढळतात.
रत्नागिरीतील आढळले दुर्मिळ ‘फ्लाईंग फिश’
पहाटे तीन वाजता ‘गंगाकृपा’ ही होडी घेऊन असगोली येथील स्थानिक मच्छिमार मासेमारीसाठी गेले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले. जाळ ओढल्यावर जीवत असलेल्या या माशांना त्यांनी होडीतील पाण्यात ठेवून दिले होते. सकाळी ८.३० च्या सुमारास मासेमारी संपवून ते असगोलीला परतले. त्यावेळी असगोलीतील समुद्रकिनार्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांनी पंख असलेले मासे दाखविले. त्यानंतर या माशांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले. समुद्रात मासेमारीला गेल्यावर अनेक वेळा पाण्यावरुन उडताना असे मासे दिसतात. परंतु हे मासे अर्थात फ्लाईंग फिश सहसा जाळ्यात अडकत नाहीत . मात्र यावेळी हे मासे असगोलीतील मच्छिमारांच्या जाळयात सापडले.
