टाटा उद्योग समूहात सत्तांतर

combo
नामवंत उद्योगपती रतन टाटा हे तीन वर्षांपूर्वी टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आणि सार्वजनिक जीवनामध्ये फारसे दिसेनासे झाले. मात्र दोनच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना ते वादाचा विषय झाले. पूर्वी म्हणजेच दीड वर्षांपूर्वी देशातल्या कथित सेक्युलर मंडळींनी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात असहिष्णुतेच्या नावाखाली बराच गहजब सुरू केला होता. तो काही दिवस चालला. त्यामध्ये साधारणतः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याची घटना न पचलेल्या हिंदुत्वद्वेष्ट्या लोकांचाच पुढाकार होता. मात्र त्या मागच्या राजकीय हेव्यादाव्याचा फारसा विचार न करता राजकारणाच्या बाहेर असलेल्या काही लोकांनीही देशात असहिष्णुता वाढत चालली असल्याचे म्हटले होते. त्यात रतन टाटा हेही सहभागी होते. नंतरच्या काळात टाटा बरेच शांत बसले. मात्र दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा असहिष्णुतेच्या विरोधात विधान केले. देशात असहिष्णुता वाढत आहे असे म्हणतानाच त्यांनी तिचे मूळ कोठे असते हे सर्वांना माहीत अशीही पुस्ती जोडली. म्हणजे दीड वर्षांच्या विश्रांतीनंतर टाटांना पुन्हा एकदा असहिष्णुतेचा साक्षात्कार झाला.

टाटा हे विनाकारण बोलणारे गृहस्थ नाहीत. ते वावदूकपणाही करत नाहीत. त्यामुळे टाटांसारखा एक माणूस देशात असहिष्णुता वाढल्याचे म्हणतो. त्याअर्थी त्यात काही तथ्य असण्याची शक्यता आहे असे काही लोकांना वाटले असल्यास त्यात काही नवल नाही. परंतु दैवदुर्विलास असा की त्यांच्या या विधानानंतर आठवडाभरातच खुद्द टाटांवरच एक असहिष्णुतेचा आरोप येण्याची शक्यता आहे. हे त्यांच्या ध्यानीमनीही नसेल. मात्र तसे घडले आहे आणि टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना अचानकपणे अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले आहे. या उद्योगसमूहात अजून तरी टाटांचाच वरचष्मा आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री यांची अचानकपण झालेली ही गच्छंती रतन टाटा यांच्यामुळेच झाली असल्याचे समजले जात आहे. या उद्योग समूहाला नवा अध्यक्ष मिळेपर्यंत रतन टाटा हेच आपल्या हाती ठेवणार आहेत. सायरस मिस्त्री यांची अचानकपणे झालेली उचलबांगडी वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. टाटा उद्योग समूहात शापूरजी पालनजी या उद्योग समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. टाटा उद्योग समूहाच्या टाटा सन्स या उद्योगात जास्त शेअर्स असणे हे तिथल्या सत्ताकारणाच्या दृष्टीने आवश्यक मानले जाते. शापूरजी पालनजी हे टाटा सन्सचे सर्वात मोठे भागधारक आहेत.

२०११ साली या उद्योग समूहातील एक भागीदार सायरस मिस्त्री यांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण आता त्यांची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे शापूरजी पालनजी आणि टाटा उद्योग समूह यांच्यात संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. शापूरजी पालनजी उद्योग समूहाने आताच तसा पवित्रा घेतला असून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी असहिष्णुपणाने झाली असल्याची तक्रार केली आहे. उद्योग समूहाच्या एखाद्या पदाधिकार्‍याला त्याच्या पदावरून हटवण्यापूर्वी आधी काही दिवस त्याला नोटीस दिली पाहिजे परंतु तशी नोटीस देण्याची तसदी टाटा उद्योग समूहाने घेतलेली नाही आणि हा एक प्रकारचा अन्याय आहे असे या भागीदार उद्योग समूहाचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात असहिष्णुतेबद्दल विधान करणार्‍या टाटांनी असहिष्णुता कोठून येते हे सर्वांना माहीत आहे असे म्हटले होते. आता त्यांनाच सायरस मिस्त्रींना अचानकपणे हटवण्यातून व्यक्त झालेली असहिष्णुता कोठून येेते हे सांगावे लागणार आहे. वास्तविक पाहता टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष होणे ही सोपी गोष्ट नसते. अनेक प्रकारच्या कसोट्यातून गेल्यानंतरच हे पद प्राप्त होत असते.

२०११ साली सायरस मिस्त्री यांची या पदावर नियुक्ती करण्यासाठी आधी पाच सदस्यांच्या समितीने पुरेशी छाननी केलेली होती. बराच विचार विनिमय केल्यानंतर मिस्त्री यांची निवड झाली. त्यांची ती निवड नियोजित अध्यक्ष म्हणून होती. तशी निवड झाल्यानंतर त्यांनी एक वर्षभर रतन टाटा यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केले आणि नंतरच त्यांच्याकडे या पदाची धुरा सोपवण्यात आली. एवढा तपास करून निवड झाली असतानाही साडेतीन वर्षांच्या काळात असे काय घडले की त्यांना पुन्हा हटवावे लागले? सायरस मिस्त्री ही रतन टाटा यांचीची निवड होती असे बोलले जाते. मात्र ती निवड त्यांची असली तरी टाटा उद्योग समूहातील अन्य अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सायरस मिस्त्री यांच्या संबंधात बर्‍याच तक्रारी केल्या आणि त्यामुळे त्यांची उचलबांगडी करणे अपरिहार्य ठरले असे सांगितले जात आहे. सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी नेमकी का झाली हे अजूनतरी स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. परंतु उद्योगांच्या वाढीला अनुकूल वातावरण असतानाही सायरस मिस्त्री यांना टाटा उद्योग समूहाचा विकास म्हणावा त्या वेगाने करता आला नाही असेही एक कारण सांगितले जात आहे. एकंदरीत टाटा उद्योग समूह हा आजवर वादातीत उद्योग समूह समजला जात होता. परंतु त्या उद्योग समूहातील शांततेचे थर आता हलायला लागले आहेत असे दिसत आहे.

Leave a Comment