थाप पचली नाही

sharad-pawar
एकेकाळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार बर्‍याच दिवसांनी नागपूर येथे जाहीररित्या प्रथमच आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानवरील सर्जिकल कारवाईमुळे मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे जळफळाट होत असलेल्या मोदी विरोधकांमध्ये शरद पवारही सहभागी झाले असल्याचे त्यांच्या नागपूरमधील विधानातून स्पष्ट झाले. राहुल गांधी तर या मांदियाळीत आघाडीवरच आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदींवर जवानांच्या रक्तात दलाली करण्याचा आरोप केला आहे. भारतीय जनता पार्टीने त्याला उत्तर देताना दलालीचा आणि कॉंग्रेसचा कसा नजीकचा संबंध आहे हे यातून दिसून येते अशी खमंग उत्तर दिले. राहुल गांधी यांचे डॅडी राजीव गांधी यांची सत्ता बोफोर्स तोफेतल्या दलालीमुळेच गेली. याची आठवण या निमित्ताने करून दिली गेली आहे. अर्थात राहुल गांधी यांचे दुर्दैव असे की ते एखादा आरोप करतात तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळते आणि त्यावर ते मूग गिळून गप्पा बसतात. आताही तसेच झालेले आहे. राहुल गांधींची ही वटवट बालिश म्हणून सोडून देता येईल. परंतु शरद पवारांचे काय? त्यांनीही या सर्जिकल कारवाईच्या संदर्भात अतार्किक भूमिका घेतली आहे.

नरेंद्र मोदींना हितोपदेश करताना शरद पवार यांनी आपण सत्तेवर असतानासुध्दा सर्जिकल कारवाई झाली होती परंतु आपल्या सरकारने तिचा गवगवा केला नव्हता असे प्रतिपादन केले आणि आपण मोठे गंभीर स्वरूपाचे राजकारण करणारे राजकारणी आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न केला. सर्जिकल कारवाईनंतर यूपीए सरकारनेसुध्दा अशी कारवाई केली होती असे पहिले विधान माजी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केले आणि नंतर तीन दिवसांनी पवारांनी त्या एका कारवाईत तीन कारवायांची आपल्या पदरून भर घालत आपल्या सरकारने चार कारवाया केल्या होत्या असा ढोल बडवला. मुळात मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल कारवाईचा गवगवा कोणी केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर एक वाक्य उच्चारले आहे आणि आपल्या सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई केलेली नाही तर आपल्या प्रदेशात म्हणजे पाकव्याप्त पाकिस्तानमध्ये कारवाई केली आहे असे म्हटले. भारत देश दुसर्‍या देशाच्या हद्दीत शिरून कारवाई करत नसतो असेही मोदी म्हणाले. सर्जिकल कारवाईच्या संदर्भात नरेंद्र मोदींनी उच्चारलेले शब्द एवढेच आहेत. मग शरद पवार गवगवा केल्याचा आरोप कोणावर करत आहेत? त्यांचा आरोप जनतेवर आहे. पण जनता गवगवा करणार नाही तर काय करील?

जनतेला आनंद झाला म्हणून जनतेने गवगवा केला. अशा गोष्टीचा गवगवा करायचा नसतो हे कथित शहाणपण १३० कोटी लोकांना शिकवणार आहात का? पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करतो पण मोदी सरकार काही उत्तरच देत नाही अशी राहुल गांधींचीच तक्रार होती. राहुलजींची री ओढत बहुतेक कॉंग्रेसवाले अशीच तक्रार करत होते. मग त्यांच्या मागणीनुसार सरकारने कारवाई केल्यास ही कारवाई केली आहे असे त्यांना सांगायला नको का? मुळात लोकांच्या मनातच निराशा होती. ती दूर करून या कारवाईने नरेंद्र मोदी यांनी देशाचा स्वाभिमान जागा केला. एवढी चांगली घटना घडल्यानंतर तिचा गवगवा करण्यात चूक काय? त्या कारवाईचे तपशील, डावपेच या गोष्टी गोपनीय ठेवल्याच पाहिजेत. परंतु ती पूर्ण झाल्यानंतर जनतेला आनंद होत असेल तर जनतेने तो व्यक्त केलाच पाहिजे. तिचा गवगवा झाल्याने पवारांना वाईट वाटेल म्हणून आनंदाचे प्रकटन थांबवता येत नाही. आपल्या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा गाण्यात पवारांना दुःख वाटत असेल पण भारतीय जनतेला नाही. तिला तर जवानांचा अभिमान वाटतो.

मात्र या संबंधात वादाचा मुद्दा वेगळाच आहे. पवार त्यांच्या सरकारने चार वेळा कारवाई केली होती असे म्हणतात तेच खरे नाही आणि तसे निवेदन माजी लष्कर प्रमुखांनीही केले आहे. पवार ज्या कारवायांचा सर्जिकल कारवाया म्हणून उल्लेख करतात त्या कारवाया सर्जिकल नव्हत्या अशी ग्वाही लष्करी कारवायांचे माजी महासंचालक विनोद भाटिया यांनी दिली आहे. म्हणजे शरद पवार ज्या कारवायांचा उल्लेख करत आहेत त्या कारवाया झालेल्याच नाहीत. पवार तशी थाप मात्र मारत आहेत. ज्या कारवायांना पवार सर्जिकल कारवाया म्हणत आहेत त्या कारवाया म्हणजे स्थानिक पातळीवर त्या त्या विभागातील लष्करी तुकड्यांनी पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर होते आणि असे प्रत्युतरसुध्दा फक्त तीनवेळा दिले गेले होते. चारवेळा नाही. पवारांनी केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्याचा आव आणून अशा कारवाईच्या वेळी काय करायचे असते, कसे मौन पाळायचे असते वगैरे दिलेला हितोपदेश हाच मुळात अनावश्यक आहे. परंतु देशाच्या राज्यकारभारातल्या काही ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्या नरेंद्र मोदींना कळत नाहीत असे भासवण्याचा प्रयत्न शरद पवार आणि त्यांचे अनुयायी करत असतात. त्याचाच हा एक भाग आहे. आता राजकारणात आणि प्रसिध्दीमध्ये कोपर्‍यात पडलेल्या शरद पवारांनी कसलेही आव आणायला हरकत नाही. पण त्यापोटी सरंक्षणाच्या क्षेत्रात थापेबाजी करू नये. त्यामुळे उलट त्यांचेच हसे होईल.

Leave a Comment