बोलघेवड्यांची वटवट

vidhansabha
सध्या महाराष्ट्रात विकासाचे राजकारण कमी आणि वाचाळांची वटवट जादा चालली आहे. राजकारणात चमकू पाहणारांची एकेक मुक्ताफळे ऐकली की या लोकांची किंव यायला लागते. माध्यमांपुढे काही तरी विचित्र बोलून किंवा बैठकांत टाळ्या घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र आता सर्वांना हवेहवेसे वाटायला लागले आहेे. खरे तर काही काम करून, समाजाची काही सेवा करून किंवा जनतेच्या हिताची कामे करून जो बोलतो त्याच्या बोलण्याला काही किंमत तरी येते पण कसलेही काम न करता आणि जमेल तसे बोलत सुटणारे लोक क्षणिक प्रसिद्धीने समाधान पावत असले तरीही ते शेवटी थट्टेचा विषय होतात. शिवसेना आणि मनसे नेते या कामात मोठे वाकबगार असतात. समाजात कार्य तर काही करीत नाहीत पण माध्यमांपुढे वचावचा बोलत सुटतात. एक मात्र खरे की बोलण्यात आणि दुसर्‍यांना कसलीही विशेषणे वापरण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. राजकारणात नेते मंडळी विकासावर, योजनांवर, त्यातल्या चुका आणि कमतरतांवर बोलले तर राजकारणाचा दर्जा टिकतो. तसे तर कोणीच बोलत नाही. अभ्यासपूर्ण वगैरे गोष्टी तर लांबच राहिल्या.

विरोधी पक्षात असलेले नेते सत्ताधारी पक्षाला दूषणे देताना सरसकट काही विधाने करीत असतात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही राहिलेली नाही, लहान मुलींवरही अत्याचार होत आहेत, शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत, सरकारला गरिबांविषयी काही काळजी नाही असे काही ठराविक आरोप अंदाजाने करायची असतात हेच या लोकांना माहीत आहे. त्या पलीकडे काही अभ्यास करून बोलावे, काही आरोपांना पुष्टी देण्यासाठी काही आकडेवारी गोळा करावी असा प्रयास तर कोणीही करीत नाही. मुद्यांवर बोलण्याऐवजी माणसावर बोलण्याकडे नेत्यांचा कल आहे. मग माणसांवर बोलायचे म्हटले की, त्याच्या बोलण्यावर, दिसण्यावर आणि असण्यावर काही टोमणे मारले जातात आणि वेळ मारून नेली जाते. मग अशा व्यवहारात कोणी तरी कोणाला गांडूळ म्हणते तर कोणी कोणाला साप म्हणते. असे लहान शाळकरी मुलांप्रमाणे परस्परावर थुंकत राहण्यापेक्षा सरकारच्या कामातल्या त्रुटी पुराव्यानिशी दाखवून दिल्या पाहिजेत. तशा त्या दाखवायच्या म्हटल्या की थोडे कष्ट घ्यावे लागतात. ग्रंथालयात जावे लागते. डोळे फोडून घेत पुस्तके चाळावी लागतात. राज्यातल्या विकास कामांच्या बाबतीतले अहवाल त्यातल्या बारीक तपशीलांसह वाचावे लागतात. मागे आर. आर. पाटील, दिलीप वळसे, आता मुख्यमंत्री असलेले देवेन्द्र फडणवीस हे असा अभ्यास करीत असत.

भाजपाचे नेते खासदार किरीट सोमैय्या यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवेपर्यंत त्यांच्या मालमत्तेचे तपशील अभ्यासले होते म्हणून त्यांना ते शक्य झाले. पण आता तसा अभ्यास फार दुर्मिळ झाला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपाच्या मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार कॉंग्रेसच्या नेत्यांनी बाहेर काढला. पण त्याच्या बाबतीतही चार दिवस टुरटुर करून आणि विधिमंडळात गोेंधळ घालून ते गप्प बसले. सगळ्या तपशीलासह त्या त्या प्रकरणाचा अभ्यास कोणीच केला नव्हता. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खोडसाळपणा या सदरात समाविष्ट झाले. आता सुप्रिया सुळे याच अचानकपणे सक्रिय झाल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका पोटनिवडणुकीत खडसवासला मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाडून भाजपाचा आमदार निवडून आला होता. हा मतदारसंघ सुप्रियाताईंच्या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, सौम्य शब्दात ती दिलीच पण आपला पराभव झाल्यावर कोणाला तरी जबाबदार धरणे हे काही योग्य नाही. तसे नकारात्मक आणि स्फोटक बोलणे आपल्या स्वभावात बसत नाही असे त्या म्हणाल्या होत्या.

त्यांच्या या विधानाने त्यांची एक वेगळीच प्रतिमा राज्यात तयार झाली होती. पण ती पार धुळीत मिळवून त्यांनी काल, वाचाळवीरांवर कडी केली. त्यांनी मुख्यमंत्री कसे बोलतात यावर आपली प्रतिक्रिया नोेंदली आणि ते कजाग बाईसारखे वसा वसा बोलतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले. खरे म्हणजे समाजाचे प्रश्‍न वेगळे आहेत. हा समाज अनेक समस्यांशी झुंजत आहे. अशावेळी कोणाच्या बोलण्याची स्टाईल कशी आहे हा टीकेचा किंवा चर्चेचा केला जावा याचाच अर्थ तो करणार्‍यांना समाजाच्या खर्‍या प्रश्‍नांची आच नाही असा होतो. बोलण्याच्या शैलीचीच चर्चा करायची झाली तर आणि सुप्रिया सुळे यांच्या या मुख्यमंत्र्यांवरील टिप्पणीला उत्तरच द्यायचे झाले तर, शरद पवार यांच्या तोंडाबाबत आणि बोलण्याच्या स्टाईलबाबत कॉमेंट करता येऊ शकते. तशी ती होऊ शकेल याचे भान सुप्रिया सुळे यांना नाही. एकंदरीतच आपल्या महाराष्ट्रात राज्याच्या परंपरेला न शोभेल अशा रितीने राजकीय विधाने केली जायला लागली आहेत. त्यातून पुढार्‍यांची प्रतिमा खराब होते आणि त्यांच्याविषयी जनतेच्या मनात आदर राहत नाही. मात्र त्याची पर्वा पुढार्‍यांनाही नाही. थोडे कमी बोलले तरी चालेल पण जे बोलू ते विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक बोलू असा पण नेत्यांनी केला पाहिजे. दोनच दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता ओम पुरी चॅनलवर चर्चा करताना कसा घसरला आणि नंतर त्याला कशी माफी मागावी लागली हे उदाहरण ताजे आहे ते सर्वांनी लक्षात ठेवावे.

Leave a Comment