पवारांची नवी खेळी

sharad-pawar
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार हे सतत प्रसिध्दीच्या झोतात राहण्याबाबत जागरूक असतात आणि कोणत्यावेळी काय विधान केल्यास प्रसिध्दीचा आपल्याकडे वळेल याचे एक उपजत ज्ञान त्यांच्याकडे आहे. हे मान्यच केले पाहिजे. परंतु कोणत्याही नेत्याकडे असलेले कौशल्य सदासर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये त्याला उपयोगाला पडेलच असे नसते. मुळात प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी करावयाची विधाने जो नेता करत असतो त्याच्या कर्तबगारीने तो लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या बोलण्याला आणि विधानांना बातमीचे मूल्य येत असते. एकदा सत्तेपासून दूर गेला किंवा राजकारणात आडबाजूला पडला की मात्र त्याची विधाने लोकांना वाचावी वाटतीलच याची काही खात्री नाही. तेव्हा शरद पवार आज काहीही बोलत असले तरी पूर्वीच्या काळी त्यांच्या बोलण्याला वजन आणि महत्त्व येत असे तसे ते आता येताना दिसत नाही. त्यांची विधाने आता आकर्षणाचा विषय ठरण्याऐवजी थट्टेचा विषय ठरण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यांच्या कालच्या विधानांनी तरी नक्कीच असे घडलेले आहे.

कोपर्डीतील घटनेवरून जातीय वातावरण किंवा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये असे या घटनेनंतर पहिले काही दिवस तरी नक्कीच बोलले जात होते. किंबहुना तशा प्रकारची अंडरस्टँडिंग सगळ्यांच्याच मनात होती. मात्र मराठवाड्याच्या काही भागामध्ये या घटनेच्या विरोधात आणि आरोपींना फासाचीच शिक्षा द्यावी अशा मागणीसाठी प्रचंड मोर्चे निघायला लागले आहेत. मराठवाड्याच्या बहुतेक सार्‍या जिल्ह्यांच्या ठिकाणी असे मोर्चे निघालेले आहेत. त्यांना उघडपणे जातीय स्वरूप नसले तरी हळूहळू तशी जागृती निर्माण व्हावी असा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यामागे राजकारणच आहे असे नाही तर असहाय्यतेची एक भावना नक्कीच आहे. या मोर्च्यांच्या जाहिरातीमध्ये ते मराठा समाजाचे आहेत असे आयोजकांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या संघटना त्यांच्या आयोजनात पुढाकार घेताना दिसतात. मुळात या सार्‍या संघटना स्थापन होताना किंवा कार्य करताना त्या केवळ मराठा समाजाच्या नव्हेत असे वारंवार सांगितले गेले असले तरी कोपर्डीच्या घटनेवरून मराठा समाजात मोठी चीड निर्माण झालेली दिसत आहे. तशी तर या घटनेवरून सार्‍या समाजातच चीड आहे. मराठा समाजात विशेष राग आहे आणि तो व्यक्त होत आहे. त्यात चूक काही नाही. परंतु ती एक निव्वळ सामाजिक प्रक्रिया आहे. तिचा लाभ उठवण्याची भावना शरद पवारांच्या मनात जागी व्हावी ही गोष्ट उचित नाही.

श्री. शरद पवार यांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे आणि मराठा समाजाचा हा असंतोष शासनाने दुर्लक्षित करू नये असेही म्हटले आहे. श्री. शरद पवार यांना असा इशारा द्यावासा वाटावा हे त्यांच्या राजकारणात दुर्लक्षित झालेल्या अवस्थेमुळे वाटलेले आहे हे नाकारता येत नाही. मराठा समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. तो राजकीयदृष्ट्या सजग आहे, निर्णायक आहे, प्रभावी आहे आणि या समाजाला दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे या समाजाच्या बाबतीत पवारांनी काही इशारा दिला की तो बातमीचा विषय आपोआपच ठरतो. तसा तो ठरून पवार प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यांनी सरकारला कोपर्डीच्या संबंधात दिलेला इशारा योग्यच आहे. परंतु या निमित्ताने शरद पवार ज्या मराठा समाजाचा कैवार घेण्याचा आव आणत आहेत त्या समाजाच्या आजच्या सर्वाधिक संवेदनशील ठरलेल्या आरक्षणाच्या विषयावर मात्र पवार एक शब्दही बोलत नाहीत. कारण या समाजाची आरक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक प्रतारणा आणि फसवणूक स्वतः पवारांनीच केलेली आहे.

अशा प्रकारचे आवाहन करताना पवारसाहेब नको त्या विषयाला विनाकारण स्पर्श करून जातीय संघर्ष पेटवण्याचा एक प्रयत्न करत आहेत. त्यांनी या निमित्ताने ऍट्रॉसिटीच्या कायद्याला हात घातला आहे. राजकारणी मंडळी महत्त्वाच्या प्रश्‍नावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी नेहमी नवा मुद्दा उपस्थित करत असतात. तसे पवारांनी आरक्षणाच्या संबंधात त्यांना आलेल्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ऍट्रॉसिटीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्या काळात ऍट्रॉसिटी ऍक्ट मंजूर झाला त्याही काळात या कायद्याला विरोध झाला होता. त्याला विरोध करणारे कोणी मोठे विचारवंत नव्हते. मात्र दलितांचा द्वेष करणारे काही सवर्ण राजकारणी या कायद्याच्या विरोधात होते. परंतु हा कायदा कसा आवश्यक आहे हे अशा लोकांना पटवून देण्याच्या बाबतीत खुद्द शरद पवारच आघाडीवर होते. आपली पुरोगामी प्रतिमा अबाधित राहावी म्हणून त्यांनी ऍट्रॉसिटी कायद्याचे समर्थन केले होते. आज तेच शरद पवार उपेक्षेच्या अंधारातून बाहेर येऊन आपल्यावर प्रसिध्दीचे झोत पडावेत म्हणून चक्क ऍट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात बोलायला लागले आहेत. वास्तविक ही विसंगती आहे परंतु ती शरद पवारांना छान शोभूनच दिसते. त्यांचे पूर्ण राजकारणच असे गेलेले आहे. वारा येईल तशी पाठ फिरवणे आणि मतांच्या प्राप्तीसाठी वेळ येईल तसे बोलणे ही पवारांची कायमचीच राजकीय शैली ठरलेली आहे.

Leave a Comment