आता गूगलचे ‘डुओ’ देणार स्काईप आणि फेसटाईमला टक्कर

google-duo
नवी दिल्ली: आता अॅन्ड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी गूगल सर्च इंजिनने आपले नवे व्हिडीओ कॉलिंग अॅप ‘गूगल डुओ’ सुरु केले असून या नव्या अॅपला व्हिडीओ कॉलिंगच्या क्षेत्रात अॅपलच्या फेसटाईम आणि मायक्रोसॉफ्टच्या स्काईपशी स्पर्धा करावी लागणार आहे.

आय. ओ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गूगलने तीन महिन्यांपूर्वीच या नव्या व्हिडीओ कॉलिंग अॅपची घोषणा केली होती. यामागे व्हिडीओ कॉलिंगमधील अडचणी दूर करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत गूगल समुहाचे उत्पादन प्रबंधक अमित फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ कॉलिंगने दोघांमधील अंतर कमी होते. यासाठी आम्ही एक नवे इंटरफेस डिझाइन तयार केले असून, हे वापरण्यास अतिशय सुलभ आहे. भारतातील दुर्गम भागांमध्येही हे अॅप काम करेल अशा दृष्टीने याच्या कनेक्टिव्हिटीचा अधिक विचार केल्यामुळे आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून जग अधिक जवळ येऊ शकेल.

आजपासून डुओची सुरुवात झाली असून, पुढील काहीच दिवसांत हे सर्वत्र उपलब्ध असेल. या नव्या सुविधेच्या सुरक्षिततेसाठी याला इनक्रिप्टेड करण्यात आले आहे.

Leave a Comment