पाकिस्तानची कुरापत

combo
गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर देशभरात आणि संसदेतही चर्चा सुरू आहे. या चर्चांत सरकारला बरेच उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. त्यातल्या त्यात भाजपावर तर दुहेरी जबाबदारी आहे कारण केन्द्रातही भाजपाचे सरकार आहे आणि राज्यातही भाजपा सत्तेत सहभागी आहे. या आधी अशाच रितीने सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनीही आपल्या कार्यकाळात हा प्रश्‍न सोडवलेला नाही, उलट तो अधिक किचकट करून टाकला. तेही आता भाजपा सरकारला उपदेश करीत आहेत. काश्मीर प्रश्‍न कसा प्रेमाने सोडवला पाहिजे असा हितोपदेश ते करीत आहेत. हिंसाचाराच्या संबंधात एक याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. अतिरेक्याशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला अटक करताना तिथल्या पोलीस अधिकार्‍यांनी त्याच्या घरात शिरून त्याला ठार केले अशी तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयानेही सरकारला आणि पोलिसांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

काश्मीरच्या जनतेच्या मनाचाही विचार करावा अशी सूचना न्यायालयाने केली आहे. काश्मीरी जनतेचा प्रश्‍न प्रेमाने आणि आपुलकीने सोडवावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. अर्थात यात नवे काही नाही. पण काश्मीरमधील जे लोक गेल्या महिनाभरापासून पोलिसांवर आणि लष्करावर नित्य तुफान दगडफेक करीत सुटले आहेत त्यांचा सहानुभूतीने विचार करावा असा सल्ला कोणी देत असेल तर त्यांना असा प्रश्‍न विचारावासा वाटतो की, अतिरेक्यांच्या आणि पाकिस्तानच्या चिथावणीला बळी पडून दगडफेक करणार्‍या या काश्मीरमधील दिशाभूल झालेल्या तरुणांना सातत्याने तोंड देऊन आपल्या जीवावर उदार होणार्‍या भारतीय जवानांचा सहानुभूतीने विचार करायला नको का? कोणाचा तरी सहानुभूतीने विचार करावा असे सांगणे सोपे आहे पण आपल्या अंगावर तुफान दगडफेक करणारांना तोडीस तोड उत्तर न देता त्यांचा सहानुभूतीने विचार करण्याचा सल्ला या जवानांना आपण द्यायला लागलो तर त्यांचे मनोधैर्य टिकेल का ? सारे काश्मीर खोरे गेल्या महिनभरापासून जळते आहे. ते तसे धुमसत ठेवण्यासाठी काय कमी कारस्थाने रचली गेली असतील का? याचा आपण विचार केला पाहिजे|

ही कारस्थाने काही स्थानिक पातळीवरच रचली गेली आहेत असेही नाही. त्या मागे पाकिस्तानचा हात आहे. लष्करे तैयबासारख्या अतिरेकी संघटनेचाही हात आहे. एवढे मोठे कारस्थान रचून काश्मीरमधील तरुणांना सातत्याने चिथावरणारा ब्ाुर्‍हाण वाणी सारखा अतिरेकी हा सातत्याने पाकिस्तानस्थित जैशे महंमदचे काम करत होता. तो लष्कराच्या जवानांना सापडला. आणि जवानांना बंदुकीचा धाक दाखवायला लागला तर जवानांनी काय त्याचे हृदयपरिवर्तन घडवण्यासाठी त्याला प्रवनच द्यावे की त्याला सरळ गोळ्या घालाव्यात ? आपल्या जवानांनी त्याला गोळ्या घालून खतम केले यात त्यांचे काय चुकले ? याबाबत सरकारचेही काही चुकले असे कोणी म्हणेल का? जवानांनी आपले कर्तव्य केले आहे. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने त्याच्या नावावर काश्मिरी तरुणांना भडकावले आणि हे तरुण आता लष्करावर दगडफेक करीत आहेत. तरीही लष्कराने त्यांच्यावर गोळ्या झाडण्याऐवजी त्यांना केवळ पांगवण्या साठी त्यांच्यावर अश्रुधुराची नळकांडीच सोडायला सुरूवात केली आहे. अजून काय माणुसकी असते?

काल काश्मीरमध्ये बहादूर अली या अतिरेक्याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या जबाबात आपल्याला पाकिस्तानात प्रशिक्षण मिळाले असल्याचे कबूल केले. त्याच्या तोंडून पाकिस्तानची सारी कारस्थाने उघड झाली आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये कोठे कोठे आणि किती प्रशिक्षण शिबिरे चालतात आणि तिथे पाकिस्तानचे अधिकारी खाजगी वेषात येऊन कसे प्रशिक्षण देतात हे या बहादूर अलीने सांगितले आहे. पाकिस्तानच्या या कारस्थानाचा भंडाफोड करणारा बहादूर अलीचा जबाब नोंदण्यात आला असून तो पाकिस्तानी अधिकार्‍यांना दाखवण्यातही आला आहे. अर्थात त्याचा या अधिकार्‍यांवर कसलाही परिणाम झालाच नसणार कारण त्यांना हे आधीच सारे माहिती आहे. गृह मंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या सरकारच्या नाकावर टिच्चून त्यांच्या या कारस्थानांचा उच्चार केला. पाकिस्तानला शांततेचे सहजीवनच नको आहे. त्याला आपण काय करणार ? आपला हा शेजारी शहाणपणाने रहातच नाही आणि राहणारही नाही. अमेरिकेने कान टोचले तरीही पाकिस्तानची खोड जात नाही. अर्थात अमेरिकेचे कान टोचणेही तेवढेच नकलीपणाचे असते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

Leave a Comment