गर्भवती महिलांसाठी बहुपयोगी अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप

shishuposhan
मुंबई- प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘आनंदी क्षण’ म्हणजे आई होणे ! गर्भवती महिला असो किंवा नवजात शिशूची आई, प्रत्येकीला आपल्या बाळाचे आरोग्य सुदृढ व चांगले असावे, अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स व संबंधित क्षेत्रात काम करणा-या संस्थांनी शास्त्रशुद्ध माहिती देणारे एक बहुपयोगी अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप तयार केले असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालय व सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढाकाराने तसेच युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड), ब्रेस्टफीडिंग प्रमोशन्स नेटवर्क ऑफ इंडिया आणि मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटी यांच्या सहकार्याने गर्भवती आणि स्तनदा माता यांना अतिशय उपयोगी ठरेल असे ‘शिशुपोषण’ (ShishuPoshan) हे अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी जागतिक स्तनपान सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात या अ‍ॅपचे लोकार्पण होणार असून जुहू येथील ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे सुयोग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान देण्याची गरज असते. तसेच पाणी देण्याची आवश्यकता नसते. आईचे दूध योग्य प्रमाणात मिळाल्यास ते मूल अधिक निरोगी व हुशार होते. या बाबी लक्षात घेऊन ‘शिशुपोषण’ हे माहितीपूर्ण अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

बाळाला स्तनपान कसे द्यावे? ते देताना कोणती काळजी घ्यावी? स्तनपानाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कसा व कोणता उपयोग होतो? तसेच कामकाजी महिलांनी स्तनपान कसे सुरू ठेवावे? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या-सोप्या भाषेत या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत.

बाळाची सुयोग्य व निकोप वाढ होण्यासाठी सर्वसाधारण काळजी काय घ्यावी? मातेचा आहार कसा असावा? पूरक आहार आणि पोषण म्हणजे काय? यासारख्या आई व बाळाशी संबंधित असणा-या विविध बाबींवर शास्त्रशुद्ध माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिशुपोषण हे अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोअरवर शिशुपोषण या नावाने सर्च करून हे अ‍ॅप आपल्या अ‍ॅण्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment