अत्याचाराला जात नसते पण…

kopardi
महाराष्ट्रात कोपर्डी येथे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्याचा सर्वांनाच संताप आला. परंतु जाणत्या लोकांनी या घटनेवरून जातकारण होऊ नये याबाबत चांगली दक्षता घेतली. अत्याचाराला जात नसते, बलात्काराला जात नसते, दहशतवादाला जात नसते असे म्हटले जाते. अप्रत्यक्षरित्या आणि छुप्या पध्दतीने दहशतवाद, अत्याचार आणि बलात्कार या मागच्या जातींचा प्रचार मात्र सुरूच असतो. कारण त्यामध्ये राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. वरकरणी तरी का होईना पण अत्याचाराला, बलात्काराला आणि दहशतवादाला जात नसते असे बोलले जाते. विशेषतः दलित अत्याचाराच्या बाबतीत राजकारणी आपापल्या परीने जात नव्हे पण पक्ष शोधत असतात आणि काही विशिष्ट राजकीय हितसंबंध असलेले पत्रकार आपल्या राजकीय विश्‍लेषणाने या नेत्यांच्या हिताला अनुकूल होईल अशा पध्दतीने त्या दलित अत्याचारांच्या मागे असलेल्या पक्षाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक दलित अत्याचाराला जात नसते तसा पक्षही नसतो. कोणताही राजकीय पक्ष दलित अत्याचारात सक्रिय होऊन समाजातली आपली प्रतिमा डागाळण्याची जोखीम घेत नसतो. परंतु द्वेषाने बाधित झालेले काही राजकीय पंडित दलित अत्याचाराच्या मागे पक्ष शोधत असतात.

सध्या गुजरातेतील उना या गावी झालेल्या दलितांवरील अत्याचारावर मोठे रणकंदन माजलेले आहे. त्यावर राज्यसभेतही चर्चा झाली. चर्चाच नव्हे तर गोंधळही झाला. किंबहुना गोंधळ घालण्यावरच विरोधकांचा भर होता. कारण उना हे गाव गुजरातेत आहे आणि तिथे भाजपाच्या हातात सत्ता आहे. तेव्हा या गावातील दलितांवरील अत्याचाराचे खापर भाजपाच्या डोक्यावर फोडणे सोपे जाते. त्यावर संसदेत गोंधळ घातला की मोठ्या बातम्या छापून येतात आणि भारतीय जनता पार्टीची प्रतिमा दलित विरोधी तयार करणे सोपे जाते. म्हणून गुजरातेतील दलित अत्याचाराच्या मागे जात नाही पण पक्ष आहे असे दाखवले जाते. सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांचा आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असणार्‍या काही पत्रकार, विश्‍लेषक तसेच राजकीय पंडितांचा हा दुटप्पीपणावर आधारलेला धंदाच झालेला आहे. याच मंडळींनी पूर्वी दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात पुरस्कार परत देण्याची टूम काढली होती. त्यानंतरही दलितांवर बरेच अत्याचार झाले परंतु तेव्हा मात्र एकही विचारवंत आपला पुरस्कार परत द्यायला पुढे सरसावला नाही. कारण त्या पुरस्कार वापसीचा कसलाही राजकीय लाभ मोदी विरोधकांना होणार नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांच्या विकासाचा एवढा सकारात्मक आणि वेगवान कार्यक्रम हाती घेतलेला आहे की त्या कार्यक्रमामुळे भाजपाचा दलितविरोधी चेहरा पूर्णपणे पुसला जाऊन दलित समाज भाजपाच्या जवळ येणार आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या प्रत्येक शाखेला आपल्या कार्यक्षेत्रात दरवर्षी एक तरी दलित उद्योगपती उभा करण्याची सक्ती केली आहे. त्या हिशोबाने भारतभरात दरवर्षी किमान एक लाख दलित उद्योजक उद्योगाच्या क्षेत्रात येणार आहेत. या उपक्रमामुळे दलित समाजाच्या परिस्थितीमध्ये किती मोठा बदल होणार आहे याच्या कल्पनेने मोदी विरोधकांची डोकी फिरली आहेत. त्यामुळे काहीही करून मोदी आणि मोदी सरकार तसेच भारतीय जनता पार्टी यांना दलित विरोधी ठरवावे असा निश्‍चयच या लोकांनी केला आहे. त्यामुळे खोटे युक्तिवाद, फसवे दावे यांच्या साह्याने मोदींच्या राज्यात दलितांवरचे अत्याचार वाढले आहेत हे सिध्द करण्याचा आटापिटा या लोकांनी सुरू केला आहे. त्यामुळे गुजरातेत उना येथे झालेल्या अत्याचारावर राज्यसभेत जाणिवपूर्वक चर्चा उपस्थित केली जाते आणि हे अत्याचार म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलेले अत्याचार आहेत असा ओढून ताणून निष्कर्ष काढला जातो.

एकदा उना येथील घटना हाताशी आली की तिचा चारी बाजूंनी वापर करण्याचा प्रयत्न मोदी विरोधक करतात. मग त्या ठिकाणी राहुल गांधींनी भेट देणे, अरविंद केजरीवाल यांनी येऊन नाटक करणे इ. प्रकार सुरू होतात. वास्तविक या उना प्रकारावर लोकसभेत चर्चा सुरू असताना राहुल गांधी झोप काढत होते. परंतु मोदींनी नालस्ती करण्याची संधी मिळते म्हणताच हेच राहुल गांधी जागे होऊन तिकडे मात्र धाव घेतात. केवळ उना येथील घटनेवरच चर्चा का? हा प्रश्‍न लोकांना पडतो परंतु लोक एवढे शहाणे नाहीत असा या भंपक लोकांचा समज आहे. वास्तविक उना येथे दलितांवर अत्याचार झाले त्याचवेळी नितीशकुमार यांच्या बिहारमध्ये अशाच चार घटना घडल्या. त्यावर मात्र हे मोदी विरेाधक मूग गिळून बसले आहेत. उना येथील अत्याचार हा दलितांवरचा असतो आणि बिहारमधला अत्याचार काही वेगळा असतो का? नेमक्या याच आठवड्यामध्ये कॉंगे्रसची सत्ता असलेल्या कर्नाटकात दोन ठिकाणी दलितांवर हल्ले झाले. तिकडे मात्र राहुल गांधी धावले नाहीत. तिथल्या दलितांच्या दुःखावर फुंकर घालण्याची गरज त्यांना का नाही वाटली? माकपा नेते सीताराम येचुरी यांनी भाजपावर आरोप करताना, भाजपाला देश दलितमुक्त करायचा आहे असा आरोप केला. परंतु याच येचुरींची सत्ता असलेल्या केरळामध्ये तीन दलित मुलींनी सातत्याने होणार्‍या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्या. या गोष्टीची या येचुरींना क्षणभरसुध्दा खंत वाटत नाही. या मंडळींचा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा याची अक्षरशः किळस येते.

Leave a Comment