२९ जुलैला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

strike
नवी दिल्ली – बँक कर्मचाऱ्यांनी बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकारने राबविलेल्या सुधारणा जनतेच्या हिताविरुद्ध असल्याचे म्हणत या सुधारणांना विरोध दर्शविला असून त्यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी २९ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपाचे नेतृत्व युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स (युएफबीयू) करणार असून आयडीबीआय बँकेचे खासगीकरण, बँकिंग क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) यासारख्या काही निर्णयांविषयी सरकार आणि बँकिंग क्षेत्रात दुमत आहे. त्याचाच निषेध नोंदविण्यासाठी युएफबीयूच्या नेतृत्त्वाखाली ९ कर्मचारी संघटना व १० लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

याबाबत माहिती देताना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी एच वेंकटचलम म्हणाले, बॅंकिंग क्षेत्रातील केंद्र सरकारच्या सुधारणा जनविरोधी असल्यामुळे खासगी क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांशिवाय, क्षेत्रीय ग्रामीण बॅंक, परदेशी बॅंका व सहकारी बॅंकांमधील कर्मचारी २९ जुलै एक दिवसीय संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांनी याआधी १२ व १३ जुलै रोजी संप पुकारला होता. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो रद्द करण्यात आला.

Leave a Comment