अन्न प्रक्रिया उद्योगाची गरज

food
सरकारने आपले परकीय भांडवलाविषयीचे धोरण शिथिल करताना अन्न प्रक्रिया उद्योगातही १०० टक्के परदेशी गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे तशी गुंतवणूक झाल्यास देशात पुढच्या दहा वर्षात एक कोटी लोकांना रोजगार मिळू शकेल असा अंदाज एका वित्तीय संस्थेने व्यक्त केला आहे. सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देणार्‍या उद्योगांवर भर दिला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये संरक्षण उत्पादन, दळणवळण अशा काही क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीची पर्यादा ४९ किंवा ७५ टक्क्यांवरून वाढवून १०० टक्के केली आहे. त्यामागेही रोजगार निर्मितीला चालना देणे हाच उद्देश आहे. परंतु या सर्व क्षेत्रामध्ये वस्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग या दोन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची मोठी संधी आहे. अमेरिकेमध्ये शस्त्रांच्या उद्योगामुळे एकूण आर्थिक उलाढालीच्या ३० टक्के उलाढाल होते. जोपर्यंत भारत, पाकिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरबस्तान, इजिप्त, सीरिया, जॉर्डन, इस्रायल असे विकसनशील देश आपापसात लढत राहतील तोपर्यंत अमेरिकेतल्या उद्योगाला काही धोका नाही.

अमेरिकेत दुसर्‍या क्रमांकाची आर्थिक उलाढाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होते आणि या बाबत तिसरा क्रमांक लागतो तो अन्न प्रक्रिया उद्योगाचा. यावरून अमेरिकेतला अन्न प्रक्रिया उद्योग किती विशाल, व्यापक आहे याची कल्पना येते. अमेरिकेला मिळणार्‍या परकीय चलनामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचा वाटा मोठा आहे. त्याच धर्तीवर भारतातलाही अन्न प्रक्रिया उद्योग देशाच्या प्रगतीला हातभार लावणारा आणि प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा ठरू शकतो. कारण अन्न प्रक्रिया उद्योगाचा आधार शेती हा आहे. देशातला शेतकरी कच्चा माल तयार करतो आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यांच्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची किंमत कमीच असते. परंतु त्याच्यापासून पक्का माल तयार होतो तेव्हा त्या पक्क्या मालाची किंमत मात्र कच्च्या मालाच्या काहीपट जास्त असते. त्यामुळे कच्चा माल तयार करणारा शेतकरी नेहमीच गरीब राहतो आणि पक्का माल तयार करणारे कारखानदार त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत होतात. उदाहरणादाखल आपण मिठाईचा विचार करू शकतो. शेतकर्‍यांचे दूध २५ रुपये प्रती लीटर भावाने विकले जाते. मात्र त्यावर प्रक्रिया करून जो खवा तयार केला जातो मात्र १५० रुपये किलो या भावाने विकला जातो. म्हणजे २५ रुपयांच्या दुधाचा खवा ५० रुपये मिळवून देतो.

या ठिकाणी दुधाची किंमत खवा तयार केल्यामुळे दुपटीने वाढते. मात्र याच खव्याचे पेढे तयार होतात तेव्हा काय घडते? १५० रुपयांच्या एक किलो खव्यामध्ये ४० रुपयांची साखर मिसळली जाते आणि अशा रितीने तयार झालेले २ किलो पेढे ८०० रुपयांना विकले जातात. अगदी मुळात जे दूध निर्माण होते त्याचाच विचार केला तरी १ लीटर दुधापासून ६०० ग्रॅम पेढे तयार होतात. ज्यांची किंमत २५० रुपये असते. म्हणजे दूध ३० रुपयांचे आणि पेढे मात्र २५० रुपयांचे. या व्यवहारातला शेतकर्‍यांची लूट करण्याचा हिशोब आपण बाजूला ठेवू. तो हिशोब शेतकर्‍यांच्या दारिद्य्राचे दर्शन घडवतो परंतु आपण देशाचा विचार केला तर अशा रितीने तयार होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ देशाला किती मोठे परकीय चलन मिळवून देतील याचा अंदाज आपल्याला येतो. आपण परदेशामध्ये शेतातला कच्चा माल विकण्याऐवजी त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यातून तयार होणारे पदार्थ विकले तर त्यातून मिळणारे परकीय चलन कितीतरी पटींनी वाढू शकते आणि त्यातून निर्माण होणार्‍या रोजगारापोटी नोकर्‍या करणार्‍यांना चांगला मोबदला देता येतो.

आपण जगाच्या बाजारात डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी अशी कितीतरी फळे विकत असतो आणि या फळांना परदेशातल्या बाजारांमध्ये देशी बाजारांपेक्षा चांगली किंमत येत असल्याने आपल्याला त्याचे कौतुकही वाटते. भारतातल्या कोणत्याही मार्केटमध्ये द्राक्षाला फार तर ६० रुपये प्रति किलो भाव मिळतो. परंतु हीच द्राक्षे मध्ये पूर्वेतल्या तेल उत्पादक देशात निर्यात केली तर त्यांना ६० रुपयांच्या ऐवजी २०० रुपये भाव मिळतो. एकंदरीत फळांची निर्यात आपल्याला पैसा देऊन जाते ही गोष्ट खरी परंतु ही फळे तशीच निर्यात न करता त्यांच्यावर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ परदेशात पाठवले तर याच २०० रुपयांच्या ऐवजी २ हजार रुपये मिळू शकतात. परंतु या मूल्यवर्धनाला आपल्या देशात म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे भारत हा ताजी फळे बाजारात विकणारा सर्वात मोठा देश ठरला आहे. इस्रायल, ब्राझील, अमेरिका या देशातही भरपूर फळांची निर्मिती होते. पण ते देश फळे विकत नसून फळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करून त्यांची निर्यात करतात म्हणून हे देश श्रीमंत आहेत. भारतातल्या आजवरच्या राज्यकर्त्यांना याचे इंगित कळलेच नव्हते. पण आता मोदी सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगातील परदेशी गुंतवणुकीला १०० टक्के अनुमती देऊन या संपत्तीच्या निर्मितीला चालना दिली आहे.

Leave a Comment