योगाचा स्वीकार

yoga
दुसरा जागतिक योग दिन पाळला जात आहे. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांना २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून पाळावा असे आवाहन केले आणि जगातल्या अनेक देशांनी या कल्पनेला दुजोरा दिला. त्यामुळे जगभरात २१ जून हा दिवस दरसाल योग दिन म्हणून पाळला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून अनेकांनी एक ठराविक प्रश्‍न उपस्थित करायला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली पण तिच्या हिंदुत्वाचे काय झाले असा प्रश्‍न विचारला जात आहे. हा प्रश्‍न विचारणार्‍याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अज्ञानी लोकांचा. या लोकांना हिंदुत्व म्हणजे मुस्लीमांचा विरोध अशीच व्याख्या माहीत आहे. तेव्हा भाजपा सत्तेवर आल्यास मुस्लीमांना धडा शिकवला जाईल अशी त्यांची कल्पना होती आणि त्या अर्थाने नरेंद्र मोदी यांनी मुस्लीमांना धडा शिकवलेला नाही म्हणजे भाजपाचे हिंदुत्व हे खोटे आहे असा त्यांचा समज झाला आहे. तेव्हा हिंदुत्वाची व्याख्या नीट न कळलेल्या अशा लोकांचा हा प्रश्‍न एकवेळ आपण समजून घेऊ शकतो. पण हा प्रश्‍न विचारणार्‍यांचा दुसरा एक वर्ग आहे.

या वर्गातले लोक जाणकार आहेत. भारतीय जनता पार्टीकडे मुस्लीमांची मते वळू नयेत यात त्यांचे राजकीय आणि वैचारिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे भाजपाला मुस्लीमांच्या विरोधात काहीतरी करण्यास उद्युक्त करणे असा त्यांचा हेतू असतो. असे लोक भाजपाच्या हिंदुत्वाचे काय झाले असा प्रश्‍न उपस्थित करत असतात. भाजपाच्या हिंदुत्वाच्या धोरणामुळे देशातली बरीच हिंदू जनता भाजपाकडे आकृष्ट झालेली आहे. भाजपाचा हा मतांचा आधार ठिसूळ व्हावा यासाठी या मतदारांच्या मनामध्ये भाजपाच्या हिंदुत्वाच्या संबंधात असलेला चुकीचा समज हे लोक जाणीवपूर्वक दृढ करत असतात. हिंदुत्व म्हणजे मुस्लीम विरोध नव्हे. हे त्यांनाही माहीत असते आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत असते. म्हणूनच अशा भाजपा विरोधकांची गोची होत असते. मात्र या दोन्ही वर्गांना हिंदुत्वाची खरी सकारात्मक कल्पना माहीत नसते. हिंदुत्व म्हणजे मुसलमान विरोध हा समज त्यांनी उराशी बाळगलेला असतो. परंतु हिंदू धर्म हा काही मुस्लीमांसाठी किंवा त्यांच्या विरोधासाठी निर्माण झालेला नाही. मुस्लीम धर्माची स्थापना होण्याच्या कितीतरी शतके आधी हिंदू धर्म रूढ होता आणि त्या शतकांमध्ये हिंदू धर्म आणि संस्कृतीने सार्‍या जगाला आदर्शवत वाटतील अशा कितीतरी गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. तेव्हा मुस्लीमांचा विषय बाजूला ठेवून या हिंदू परंपरांचा जागर करणे हेच खरे हिंदुत्व आहे.

योग शास्त्र ही हिंदू संस्कृतीने जगाला दिलेली एक देणगी आहे. योग शास्त्रामध्ये शारीरिक व्यायाम, मनाचे आरोग्य आणि जीवन जगण्याचे तत्वज्ञान या संदर्भात आजच्या आधुनिक युगातल्या संशोधनापेक्षाही प्रगत संशोधन करण्यात आलेले आहे. आज आपण ज्या योगाचा आधार घेतो तो अष्टांग योग हा पतंजली मुनींनी लिहिलेल्या पातंजल योग शास्त्रात दिलेला आहे. पतंजली मुनींचा कार्यकाल इसवी सनाचे दुसरे शतक ते इसवी सन पूर्व २०० वर्षे या दरम्यान कधीतरी सांगितला जातो. म्हणजे पतंजली मुनींना आपला ग्रंथ लिहून आता १८०० ते २२०० इतकी वर्षे झालेली आहेत. त्याने काही योग शास्त्र निर्माण केलेले नाही. त्यांच्याही पूर्वी हिंदू संस्कृतीच्या ग्रंथांमध्ये ग्रथित झालेले आणि विखरून पडलेले योग शास्त्राचे ज्ञान त्यांनी संकलित आणि संपादित केले आहे. म्हणजे योग शास्त्राचा कालावधी साधारण ३ हजार वर्षांपर्यंत नेता येतो. या काळामध्ये एवढे प्रगत ज्ञान भारतीयांना होते. हे आपल्या संस्कृतीच्या थोरवीचे लक्षण आहे. आपण ज्याला हिंदू संस्कृती म्हणतो तिच्यात योग शास्त्राला त्यामुळेच महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीमध्ये योगाबरोबरच आयुर्वेद, ज्योतिष अशी इतरही काही शास्त्रे निर्माण झालेली आहेत.

या शास्त्रांचा केवळ हिंदूंनाच नव्हे तर सार्‍या जगाला उपयोग होऊ शकतो. तेव्हा हिंदू धर्माचा उध्दार करणे म्हणजे मुसलमानांना अद्दल घडवणे नव्हे तर हिंदू धर्म संस्कृतीने निर्माण केलेल्या या शास्त्रांचा आणि परंपरांचा प्रचार करणे होय. तेच काम नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर केले आहे. एक हिंदुत्ववादी नेता हिंदुत्वाचा सकारात्मक विचार करून काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. योगाबरोबर आयुर्वेदाचेही महत्त्व वाढवण्यास मोदी सरकारने प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर आयुर्वेदाच्या संशोधनाला गती दिलेली आहे. आज जगातील १९२ देशांमध्ये योग दिन पाळला जात आहे. कित्येक देशांच्या राजधान्यांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये हजारो लोक मोठमोठ्या मैदानांवर एकत्र येऊन योगाभ्यास करणार आहेत. योग दिनाने नेमके काय झाले असाही प्रश्‍न विचारला जातो परंतु वर्षभराच्या काळामध्ये योगाविषयी केवळ जाणीव जागृतीच नव्हेतर योगाभ्यास करण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. भारतातल्या अनेक योग शिक्षकांना परदेशात मागणी आलेली आहे. जीवन चांगल्या पध्दतीने जगण्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे हे लोकांना जाणवायला लागले आहे आणि ४० मुस्लीम देशांसह १९१ देशांमध्ये योग शिक्षण हा व्यवसाय म्हणून वृध्दिंगत झाला आहे.