देवास पॅटर्नने दिली दिशा

jalyukt-shivar
सध्या महाराष्ट्रात दुष्काळाशी सामना करण्याकरिता अनेक प्रकारचे उपाय योजले जात आहेत. त्यानुसार जलयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. तिच्यामध्येच शेततळे खोदण्याचा एक उपक्रम आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेततळी खोदली आहेत. त्यात पावसाचे पाणी साचवले जाते आणि पावसाने मध्येच दडी मारल्यामुळे पिके वाळायला लागली की त्या पिकांना या शेततळ्यातले पाणी देऊन ती वाचवली जातात. हा प्रयोग महाराष्ट्रात आता चांगलाच यशस्वी व्हायला लागला आहे. मात्र त्याचा उगम नेमका कोठे आहे आणि अशा प्रकारची तळी खोदून पिके वाचवावीत हा प्रयोग पहिल्यांदा कोठे केला गेला आहे हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. या शेततळ्याचे खरे उद्गाते मध्य प्रदेशातले आहेत.

मध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यातील निपाणीया या गावी २००५ साली शेततळ्याचा पहिला प्रयोग केला गेला. तो चांगलाच यशस्वी झाल्यामुळे तो देशभरात पसरला. निपाणीया येथील महेश पटेल आणि त्यांच्या बांधवांनी हा प्रयोग केलेला होता. त्यांच्या मालकीची ५० बिघे जमीन तेथे आहे. मात्र पावसाची अनिश्‍चितता आणि प्रचंड प्रमाणावर वाढलेले तापमान यामुळे शेतामध्ये फारसे पीक येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ५० बिघ्यांपैकी दोन बिघे जमिनीमध्ये शेततळे खोदले. पूर्ण दोन बिघे जमीन तलावात गुंतली. तलावाची खोली १५ फूट होती. त्यांच्या या तलावाने त्यांची खरिपातली पिके तर वाचलीच पण खरिपात चांगला पाऊस पडला तर त्यांच्या तळ्यामध्ये भरपूर पाणी शिल्लक राहायला लागले.

या शिल्लक राहिलेल्या पाण्यावर त्यांनी रब्बी हंगामात दुसरी पिके घ्यायला सुरूवात केली. या तलावात साचलेले पाणी फार नव्हते. परंतु रब्बी हंगामात अशी काही पिके आहेत की ज्यांना एखादे जरी पाणी मिळाले आणि ते हलके जरी असले तरी पीक चांगले येते. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे उदाहरण देता येईल. रब्बी ज्वारी तशी वरच्या पाण्याशिवायच येते. परंतु त्या ज्वारीला एखादे जरी पाणी मिळाले तरी भरघोस पीक येते. अशाच रितीने त्यांनी शेततळ्याच्या पाण्याच्या जोरावर रब्बीमध्ये गव्हाचे पीक घेतले. अशा गव्हाच्या पिकाला वरून पाणी मिळाले नाही तर एका बिघ्याला ५० किलो एवढे उत्पन्न मिळते. परंतु शेततळ्यातले पाणी दोन वेळा दिल्याने बिघ्याला ५०० किलो उत्पादन झाले. अशा रितीने कल्पकतेने केलेल्या एका उपायातून त्यांचे उत्पन्न काही पटींनी वाढले.

Leave a Comment